
वैभववाडी : कुसूर खालची बौध्दवाडी येथील सुनीता नारायण कांबळे यांच्या घराला शॉटसर्किटमुळे आग लागली. ही घटना मंगळवारी (ता.४) मध्यरात्री घडली. या आगीत घराचा काही भाग जळून सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने इतर कोणतीही हानी झाली नाही.
कुसूर खालची बौद्धवाडी येथे सुनीता कांबळे यांचं घर आहे.या घरात त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील पाच माणसे राहतात. मंगळवारी रात्री जेऊन ओटपल्यानंतर हे कुटुंब झोपी गेले. दरम्यान मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास घराच्या काही भागाला शॉटसर्किटमुळे अचानक आग लागली. मात्र गाढ झोपेत असलेल्या कांबळे कुटुंबियांनी आग लागल्याचे प्रथम समजले नाही.या आगीमुळे घराच्या शेजारी असलेल्या शेळ्यांच्या गोठ्यातून शेळ्या मोठ मोठयाने ओरडू लागल्या.या आवाजाने कांबळे कुटुंबातील सदस्यांना जाग आली. त्यानंतर त्यांना घराला आग लागल्याचे समजले.घरातलील लोकांनी बाहेर येऊन आरडाओरडा केल्यानंतर वाडीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला.ग्रामस्थानी गोठ्यातील शेळ्यांना बाहेर काढले. तसेच शर्थीच्या प्रयत्न करून सर्व आग विझवली. या आगीत घराचा काही भाग जळून गेला आहे.या घटनेची माहिती मिळताच तलाठी गणपत शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.