
सावंतवाडी : ऐन गणेशोत्सवात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एकीकडे गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडलेले असतानाच अतिवृष्टीमुळे अनेक भागात छोट्या मोठ्या प्रमाणात पडझड होऊन नुकसान झाले आहे. शहरातील सालईवाडा मारुती मंदिर परिसरात एक जुने मातीचे घर कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घरात कोणीही राहत नव्हते. मात्र, या दुर्घटनेमुळे कुटुंबाचे एक लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.
ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. अतिवृष्टीमुळे फिमेन लेमॉस यांच्या मालकीचे हे जुने घर अचानक कोसळले. या घटनेत घराचा मोठा भाग कोसळल्याने घराच्या अवशेषांचा ढिगारा सर्वत्र पसरला आहे.
या कोसळलेल्या घराला लागूनच बांदेकर कुटुंबियांचे घर आहे. लेमॉस यांच्या घराचा काही भाग कोसळल्यामुळे बांदेकर यांच्या घरालाही धोका निर्माण झाला आहे. बांदेकर कुटुंबियांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी तात्काळ प्रशासनाकडे मदत आणि योग्य कार्यवाहीची मागणी केली आहे. सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील आणि नगरपरिषद प्रशासनाने या धोकादायक घराकडे लक्ष देऊन पुढील संभाव्य दुर्घटना टाळावी, अशी मागणी बांदेकर कुटुंबियांनी केली आहे. गणेशोत्सवाच्या धामधुमीत झालेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सावंतवाडी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.