
दोडामार्ग : साटेली भेडशी येथे घरगुती सिलिंडरचा मोठा स्फोट होऊन घर जळाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यात अंकिता अर्जुन नाईक यांचे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नगरपंचायतच्या अग्निशमक बंबाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत संपूर्ण घर आगीत बेचिराख झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की साटेली भेडशी वरचा बाजार येथील अंकिता नाईक यांचे नवीन घर बांधकाम सुरू आहे. त्यामुळे त्या दुसऱ्या घरात तात्पुरत्या राहत होत्या. मंगळवारी दुपारी त्या शेजाऱ्यांकडे गेल्या असता त्यांच्या दुसऱ्या घरातून मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला. हा आवाज इतका प्रचंड होता की त्याची ध्वनी लगतच्या परमे, घोटगे गावातही ऐकू गेली. यावेळी ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. घरातून मोठ्या धुराचे लोट बाहेर पडत होते. क्षणातच आग पेटली व आगीने रौद्ररूप धारण केले.
ही आग तब्बल वीस फुटांपर्यंत फेकली गेली. यात लगतच्या नारळाच्या झाडालाही आगीने वेढले. घटनेची माहिती नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांना कळाली. त्यांनी त्यांच्या नगरपंचायतीचा अग्निशामक बंब मागविला. या बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र त्यापूर्वीच घरातील कपाट, फ्रिज, कपडे, पुस्तके, सोफासेट, खुर्च्या, लाकडी बिछाना आगीत जळून खाक झाले. शिवाय रोख ३५ हजार रुपये आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. संपूर्ण घरच आगीत भस्मसात झाले. यात अंकिता नाईक यांचे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.