घर - अंगणातील मंडपावर कोसळले जांभळीचे झाड

Edited by: विनायक गावस
Published on: June 26, 2023 20:47 PM
views 144  views

सावंतवाडी : ओटवणे गावठणवाडीत मुख्य रस्त्यालगतचे जांभळीचे झाड अचानक भर रस्त्यासह लगतच्या घर व अंगणातील मंडपावर कोसळले. प्रथम विजवाहिनीवर हे झाड कोसळले. सोमवारी सकाळी १० च्या सुमारास घडलेल्या या घटनेत रहदारीची वेळ असूनही सुदैवाने कुणाला दुखापत झाली नाही. मात्र घरमालक पांडुरंग ऊर्फ बाळू जगन्नाथ गावकर यांच्या लोखंडी मंडपासह घराचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. याच ठिकाणी प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच गावाचे केंद्र स्थान आहे. त्यामुळे नेहमी या ठिकाणी वर्दळ असते. तसेच झाड कोसळले ती वेळ मुलांच्या शाळेत जायची होती. मात्र दैव बलवत्तर म्हणून या घटनेत शाळकरी मुलांसह पादचारी व वाहन चालक बचावले. सुदैवाने घराच्या अंगणातही कोणी नव्हते. सुरुवातीला वीज वाहिन्यावर हे झाड कोसळल्यामुळे विजतारा तुटल्या तसेच खांबही कलंडले.


पांडुरंग गावकर यांनी आठ दिवसापूर्वीच अंगणात लोखंडी मंडप घातला होता. मात्र रस्त्यालगतचे हे झाड थेट या मंडपावरच कोसळल्यामुळे मंडपाचे अतोनात नुकसान झाले. ओटवणे - कारीवडे या मुख्य मार्गावरच हे झाड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.