सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार वाढीसाठी हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण कार्यक्रम राबवावा : मंत्री दीपक केसरकर

Edited by: विनायक गावस
Published on: March 15, 2024 15:00 PM
views 112  views

मुंबई : पर्यटन हा सर्वाधिक रोजगार देणारा व्यवसाय आहे. या व्यवसायातून स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधी अधिकाधिक वाढाव्यात यासाठी कौशल्य विकास विभाग आणि पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण देण्यासंदर्भात कार्यवाही करावी, अशी सूचना शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केली.

बालभवन येथे मंत्री श्री. केसरकर यांनी वेंगुर्ला येथे हॉटेल ताज उभारणी आणि त्या अनुषंगाने पर्यटन वाढ यासंदर्भात बैठक घेतली. पर्यटन सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आदींची यावेळी उपस्थिती होती.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात अनेक पर्यटक भेट देत असतात. या भागामध्ये पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता येथे एमटीडीसीच्या मार्फत नवीन हॉटेल सुरू करण्यात येत आहेत. त्यापैकीच हॉटेल ताज वेंगुर्ला येथे सुरू करण्यात येणार आहे. स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधी वाढाव्यात; त्या क्षेत्रात प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ तयार व्हावे यासाठी कौशल्य विकास विभागाने पर्यटन विभागाने प्रयत्न करावेत अशा सूचनाही त्यांनी  केल्या.