जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यास हॉस्पिटल, लॅब अपयशी ; सलाईन, इंजेक्शन, सुया उघड्यावर फेकल्या !

प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली नोटीस
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 03, 2023 18:15 PM
views 191  views

शशिकांत मोरे

रोहा : शहरातील मोकळ्या जागेवर सलाईन,  इंजेक्शन, सुया, कापसाचे बोळे असा जैविक कचरा फेकला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचे धोरण असले तरी हॉस्पिटल आणि लॅब जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर फेकणाऱ्या डॉक्टरांना पालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीसा बजावल्या आहेत.

 रोह्यात सार्वजनिक घनकचऱ्यामध्ये वैद्यकीय जैविक कचरा टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सलाईनच्या रिकाम्या बाटल्या, वापरलेल्या सुया, इंजेक्शनच्या काचेच्या बाटल्या, कापसाचे भिजलेले गोळे आदींचा यात समावेश आहे. शहरात सुका व ओला कचरा वर्गीकरणासह वेगळा करण्याचे धोरण नगरपालिकेने आखले आहे. असे असताना वैद्यकीय जैविक कचरा थेट सार्वजनिक कचऱ्यात सापडत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास आणि पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे.


नोंदणी नसलेल्या हॉस्पिटल, लॅबवर कारवाई

चिपळूण येथील लोटे एमआयडीसीतील 'महाराष्ट्र बायो हायजेनिक मॅनेजमेंट' ही संस्था रोह्यातील जैविक कचरा नेऊन तांत्रिक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याचे काम करते. ही संस्था रोज दवाखाने, प्रयोगशाळा आणि रुग्णालयातून हा कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावते. रोह्यात व्यवसाय करणारे ६० डॉक्टर्स असून १२ प्रयोगशाळा आहेत. नोंदणीकृत नसलेले डॉक्टर मात्र उघड्यावरच हॉस्पिटल, लॅबमधील कचरा टाकतात. अशा लॅब आणि हॉस्पिटलवर पालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई सुरू केल्याचे मुख्याधिकारी डॉ. धीरज चव्हाण आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी व्ही. व्ही. किल्लेदार यांनी सांगितले.