ज्येष्ठ नागरिक सेवा मंचातर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान !

Edited by: विनायक गावस
Published on: October 11, 2023 16:22 PM
views 158  views

सावंतवाडी : ज्येष्ठ नागरिक सेवा मंचातर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठांचा तसेच समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला. यात कास गावाच्या रहिवाशी तथा ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय योगदान देणार्‍या मंगल कामत यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर येथील ज्येष्ठ नागरिक सेवा मंचाचे अध्यक्ष प्राचार्य अन्वर खान, उपाध्यक्ष श्री. सावंत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड.  नकुल पार्सेकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, सदस्य श्वेता कोरेगावकर, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रमोद कामत, संघाचे सचिव गुरुनाथ नार्वेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

मंगल कामत ह्या तब्बल गेली तीन तप सामाजिक, शैक्षणिक, महिला सबलीकरण तसेच पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात आपले योगदान देत असून त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन बांदा येथील ज्येष्ठ नागरिक सेवा मंचातर्फे त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.