
सिंधुदुर्गनगरी : पत्रकारांची मुले शिक्षणाच्या विविध वाटा चोखाळत यश मिळवित आहेत, ते पाहून समाधान वाटत आहे. पत्रकारिता ही समाजसेवा करताना आपल्या मुलांकडे, त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता त्यांना योग्य प्रकारे घडविले जात आहे, ही समाधानाची बाब आहे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी बुधवारी सत्कार कार्यक्रमात बोलताना केले.
सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सभासद मुलांचा सत्कार सिंधुदुर्गनगरी येथील आद्यपत्रकर बाळशास्त्री जांभेकर भवनाच्या बैठक सभागृहात बुधवारी दुपारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री चिलवंत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष लवू म्हाडेश्वर होते. यावेळी व्यासपीठावर राज्य परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, जिल्हा पत्रकार संघ सचिव बाळ खडपकर, ज्येष्ठ सदस्य नंदकुमार आयरे उपस्थित होते.
२०२४ आणि २०२५ या दोन वर्षातील गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. यात २०२४ मध्ये बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्या वालावलकर, दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सोनम काळसेकर यांचा सत्कार करण्यात आला. २०२५ मध्ये दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या भूमिका हरमलकर, बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पूर्वा गावडे व ऋषिकेश आयरे तसेच बीएससी नर्सिंग पदवी प्राप्त केलेल्या अस्मिता म्हाडेश्वर आणि बीएससी स्टेटस्टिक पदवी प्राप्त केलेल्या प्रियंका जेठे या मुलांचा सन्मानपत्र, भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला.
यावेळी गणेश जेठे, बाळ खडपकर यांनीही विचार व्यक्त केले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री म्हाडेश्वर यांनी 'आजचा कार्यक्रम म्हणजे आमच्यासाठी कौटुंबिक सोहळा आहे. गेल्यावर्षी काही कारणाने हा कार्यक्रम होवू शकला नव्हता. तर आता काही दिवसांत शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे मुले उपलब्ध होणार नाहीत. परिणामी अगदी दोन दिवसांत हा कार्यक्रम आम्ही ठरविला. परंतु आमच्या सर्वांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित राहिल्याने आनंद झाला. आमचे सभासद पाल्य पूर्वा गावडे हीची आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तिचा आम्ही मोठा सत्कार सोहळा करणार आहोत', असे सांगितले. सूत्रसंचालन विनोद दळवी यांनी केले. आभार सचिव दत्तप्रसाद वालावलकर यांनी मानले. यावेळी संदीप गावडे, संजय वालावलकर, तेजस्वी काळसेकर, मनोज वारंग, विनोद परब, सतीश हरमलकर या सभासदांसह त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.