
सावंतवाडी : यशाने हुरळून न जाता भविष्यातील ध्येय निश्चितीसाठी सतत प्रयत्नशील रहावे. आई- वडीलांनी आपल्या पाल्याला योग्य मार्गदर्शन,चांगले संस्कार देण्यासोबत पाल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात जाण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन शिवसेना नेते तथा माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी केले. शिवसेना सावंतवाडी व दीपक केसरकर मित्रमंडळाच्यावतीने आयोजित सावंतवाडी तालुक्यातील दहावी बारावी परीक्षेमध्ये पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा येथील वैश्य भवन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शिवसेना सावंतवाडी व दीपकभाई केसरकर मित्रमंडळ यांच्यावतीने सावंतवाडी तालुक्यातील सर्व शाळा व ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. वैश्य भवन येथे हा सोहळा पार पडला. दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला व्यासपीठावर माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, महिला जिल्हा संघटक अॅड. निता कविटकर, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, सावंतवाडी विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई,शहर प्रमुख बाबू कुडतरकर, सावंतवाडी तालुका प्रमुख बबन राणे, वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितिन मांजरेकर, गुणाजी गावडे, खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्लेच्या वनस्पती शास्त्रज्ञ धनश्री पाटील,सुरज परब,सुरेंद्र बांदेकर, सपना नाटेकर, शुभांगी सुकी, सुजित कोरगावकर,आबा केसरकर, नंदू शिरोडकर, नरेंद्र मिठबांवकर, शर्वरी धारगळकर, गजानन नाटेकर, भरत गावडे, भार्गव धारणकर, भाई देऊलकर, प्रा. सिद्धार्थ तांबे, प्रा.दशरथ सांगळे आदी उपस्थित होते.
पोकळे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी हा या सत्कारामागचा उद्देश आहे. भविष्यातील वाटचालीचा विचार करता बऱ्याच विद्यार्थासमोर दहावी, बारावी नंतर पुढे काय ? असा प्रश्न पडतो. मात्र, प्रत्येकाने योग्य विचार करुन आपल्याला आवड आहे त्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आजकाल स्पर्धा परीक्षांमध्ये आपली मुले मागे पडतात. त्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करा.
यावेळी वेंगुर्ला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणाऱ्या सुरंगी कळे आणि फुले यांच्यावर अभ्यास करण्यासाठी उत्तराखंड येथे गेलेल्या तुळस येथील तन्वी तुळसकर व वेतोरे येथील करिश्मा मोहीते या दोघांचा सत्कारही करण्यात आला. त्यांना खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्लेच्या वनस्पती शास्त्रज्ञ डॉ.धनश्री पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या दोन्ही विद्यार्थीनीनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे विशेष आभार मानले. मंत्री केसरकर यांच्या आर्थिक सहकार्यानेच आम्ही हा अभ्यास दौरा करू शकलो असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रेमानंद देसाई यांनी तर आभार शहरप्रमुख बाबु कुडतरकर यांनी मानले.