आरोस येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

आरोस ग्रामस्थ मंडळ मुंबईचा पुढाकार
Edited by: रुपेश पाटील
Published on: December 05, 2022 19:23 PM
views 190  views

सावंतवाडी : विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्याल, आरोस या ठिकाणी आरोस ग्रामस्थ मंडळ, मुंबईच्या वतीने गुरुवार दिनांक १ डिसेंबर रोजी देवी माऊली जत्रोत्सवाचे औचित्य साधून सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण होऊन पहिल्या तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला.

आरोस गावातील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल दरवर्षी लक्षणीय लागतो. मुलांच्या यशामुळे गावाचे नाव नक्कीच रोशन होते. त्यामुळे गावातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करणे म्हणजे पुढील पिढीला यशप्राप्तीसाठी प्रोत्साहित करणे, हे ध्येय समोर ठेऊन आरोस ग्रामस्थ मंडळाकडून यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला मंडळाचे सेक्रेटरी सुनील नाईक, उपाध्यक्ष दयानंद नाईक, सहसचिव भाऊ मयेकर व मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते प्रसाद नाईक, शाळेचे मुख्याध्यापक सदाशिव धूपकर, निलेश देऊलकर, सावंत सर, व शाळेची मुख्यमंत्री अपूर्वा नाईक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश देऊलकर यांनी केले. नंतर मंडळाचे उपाध्यक्ष दयानंद नाईक व सेक्रेटरी सुनील नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व मुलांचे कौतुक केले. तसेच मुख्याध्यापक धूपकर यांनी मार्गदर्शन करून आरोस ग्रामस्थ मंडळ, मुंबईच्या स्तुत्य उपक्रमासाठी आभार मानले व मंडळाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.