व्यापारी रत्नाकर कदम यांचा प्रामाणिकपणा

मजुराचे सापडलेलं पाकीट केलं पोलीसांच्या स्वाधीन
Edited by:
Published on: January 24, 2025 15:09 PM
views 509  views

वैभववाडी : येथील बाजारपेठेत  रंगकाम करणाऱ्या मजुराचे पैशाचे पाकीट येथील जेष्ठ व्यापारी रत्नाकर कदम यांना सापडले. त्यांनी हे पाकीट पोलीसांच्या स्वाधीन केले. पोलीसांनी ओळख पटवून हरिश्चंद्र रामकुमार राव याच्या स्वाधीन हे पाकीट केलं. या पाकीटात १३ हजार ४०० रुपये एवढी रक्कम होती. कदम यांच्या प्रामाणिकपणाबद्दल पोलीसांनी त्यांचं अभिनंदन केले.

हरिश्चंद्र राव हा शहरात रंगकाम करतो. गुरुवारी तो किराणा माल खरेदी करिता कदम यांच्या दुकानात आला होता. माल खरेदी करून झाल्यानंतर तो त्याचे पाकीट दुकानाच्या  काऊन्टर वरच विसरून गेला. दुकान बंद करताना हे पाकीट कदम यांना सापडले. पाकीटात दोन आधारकार्ड व १३ हजार ४०० रुपये एवढी रक्कम होती. कदम यांनी हे पाकीट रात्री पोलीस स्थानकात नेऊन दिले. त्याच दरम्यान हा मजूर शहरातील व्यापारी सोमनाथ महाजन यांच्याकडे गेला. त्यांना आपलं पाकीट हरविल्याचे सांगितले. त्यांनी याबाबत पोलीसांना पळविले. पोलीसांनी खातरजमा करून ते पाकीट त्याच्या स्वाधीन केले. कदम यांच्या प्रामाणिकपणाबद्दल पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांनी अभिनंदन केले. यावेळी  पो. हे. कॉ. आरती भुसांडे, सोनल गोसावी, पो. कॉ. अजित पडवळ, संदीप राठोड आणि व्यापारी सोमनाथ महाजन उपस्थित होते.