रत्नागिरीत शाळा - कॉलेजना सोमवारी सुट्टी !

Edited by: देवयानी वरसकर
Published on: July 14, 2024 15:18 PM
views 156  views

रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये ( अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या सोमवार  दि. १५ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिला. 

      या आदेशात म्हटले आहे, प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरुन जिल्ह्यातील त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेवून, संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील ठराविक स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून प्रदान करण्यात आले आहेत. आपती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. 

हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यात उद्या दिनांक १४ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने तसेच खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. चिपळूण येथील वाशिष्ठी नदी, राजापूर येथील कोदवली नदी, लांजा येथील मुचकुंदी नदी यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुसूचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये (अंगणवाडी,पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या दिनांक १५ जुलै रोजी सुट्टी असणे आवश्यक आहे.