पाणीटंचाई आढावा बैठक घ्या | रुपेश राऊळ यांची तहसीलदारांकडे मागणी

आठवडाभरात घेणार पाणीटंचाई आढावा बैठक | तहसीलदार उंडे यांची ग्वाही
Edited by: विनायक गांवस
Published on: May 17, 2023 11:25 AM
views 157  views

सावंतवाडी : तापमान वाढत आहे तसेच उष्णतेच्या तीव्रतेने पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे सावंतवाडी शहरांसह तालुक्यातील अनेक भागात पाणी टंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे, मात्र तरीही प्रशासनाने याबाबत नियोजन करण्यासाठी बैठक आयोजित केली नसल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी तहसीलदार अरूण उंडे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि तातडीने आढावा बैठक आयोजित करण्याची मागणी केली.


तहसीलदार अरूण उंडे यांची भेट घेऊन  तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी चर्चा केली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य  राजन मुळीक उपतालुकाप्रमुख आबा सावंत ,विभाग प्रमुख सुनील गावडे, उपविभाग प्रमुख विनोद ठाकूर, प्रशांत बुगडे आदी उपस्थित होते.


यंदाच्या हंगामामध्ये उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती आणि ती वस्तुस्थिती सध्या नागरिकांना जाणवत आहे. या उष्णतेच्या लाटामुळे भूगर्भपातळी कमी झाली असून नदी नाल्यांचे पाणी देखील आटले आहे.


सावंतवाडी शहरातील मोती तलावाचे पाणी देखील सोडण्यात आल्याने नैसर्गिक पाणीटंचाई शहरात झाली आहे. सर्वत्र पाणीटंचाईचे भीषण संकट येण्याची शक्यता असताना प्रशासनाने याबाबत आढावा बैठक घेण्याचे टाळणे टाळले आहे. यासाठी लवकरात लवकर आढावा बैठक घेऊन पाणीटंचाईची नियोजन करावे असे रुपेश राऊळ यांनी या चर्चेत तहसीलदार यांना सुचविले.


याशिवाय सावंतवाडी शहरासह तालुक्यातील पाणीटंचाईचा आराखडा करताना पावसाच्या पूर्वी कामे व्हायला पाहिजेत याची दक्षता देखील घ्यावी पावसाच्या तोंडावर कामे काढली तर त्यामुळे नागरिकांना किंवा जनतेला फायदा होणार नाही हेही लक्षात घ्यावे असे देखील सांगितले.

 यावेळी तहसीलदार अरुण उंडे यांनी येत्या आठवड्याभरात पाणीटंचाई बाबत आढावा बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांना दिले आहे.