
सावंतवाडी : शहरातील एकमेव माठ्याचा जत्रोत्सव सोमवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोंसले, युवराज लखमराजे भोंसले यांनी सहकुटुंब 'राजश्री' राजेसाहेब तिसरे खेम सावंत भोंसले यांचे आशीर्वाद घेतले. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, दशावतारी नाटक आदी कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले.
सावंतवाडी संस्थानच्या सावंत-भोसले घराण्याचा समावेश इतिहासाला ज्ञात शुर योद्ध्यांमध्ये आहे. ४०० वर्षांचा इतिहास सावंतवाडी संस्थानला आहे. राजश्री तिसरे खेम सावंत हे विद्याप्रेमी, विद्येची अभिरुची असलेले एकमेव राजा होते. दानशूर राजा म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी अनेक लोकांना, देवस्थानांना जमिनी व रोख रकमा दिल्या होत्या. आज संस्थानात जी इनामे चालू आहे त्यातील बरीच इनामे ही त्यांच्या काळातील आहेत. त्यांच्या काळातील एक उदाहरण म्हणजे प्रसिद्ध देवस्थान श्री देव आत्मेश्वर देवस्थान. हे देवस्थान त्यांच्या कारकीर्दीतील असून मंदीरासमोरील तळीला देखील जाज्वल्य इतिहास आहे.
माठेवाडा इथं संस्थानच्या पराक्रमी राजांची स्मारक उभारण्याची परंपरा आहे. याला 'माठे' असं संबोधलं जातं. तिसऱ्या खेमसावंतांचे माठे हे दैविकदृष्ट्या प्रसिद्ध असून या ठिकाणी दरवर्षी जत्रा भरते. सावंतवाडी शहरासह आजूबाजूच्या गावातील लोक या जत्रोत्सवास आवर्जून येतात. जिल्ह्यातील इतर जत्रा या रात्रभर चालतात. मात्र ही जत्रा दिवसा भरते. संस्थानच्या वीर वंशजांच स्मरण माठ्याच्या जत्रोत्सवात केल जात. सावंतवाडी शहरात होणारा हा एकमेव आणि ऐतिहासिक जत्रोत्सव आहे.माठेवाडा येथील जत्रोत्सवासाठी मोठ्या संख्येने खाज, खेळण्यांसह खाद्यपदार्थांची दुकान सजली होती. मोठ्या संख्येने नागरिक यावेळी माठेवाडा इथं उपस्थित होते. कोकणातील इतर जत्रा या रात्रीच्या भरतात. ही जत्रा मात्र सकाळी भरते व रात्री लवकर संपते.