
कणकवली : गुढीपाडवा व हिंदू नववर्षानिमित्त गुरुवार १९ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वा. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा २०२६ काढली जाणार आहे. या यात्रेत हिंदुंनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीचे प्रसाद ठाकूर, प्रतिभा करंबेळकर, नंदकुमार आरोलकर यांनी केले. येथील उत्कर्षा हॉटेल येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रसाद ठाकूर म्हणाले, गुढीपाडवा व हिंदू नववर्षानिमित्त गेली चार वर्षे हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढली जाते आहे. यंदाचे ५ वर्ष असून गुरुवार १९ रोजी सायं. ४.३० वा. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून यात्रा काढण्यात येणार आहे. पटवर्धन चौक, झेंडा चौक, ढालकाठीमार्गे विद्यामंदिराच्या पटांगणावर दाखल होणार आहे. याठिकाणी असलेल्या शिवारा मंदिरात यात्रेचा समारोप होईल. यात्रेत लेझीम पथक, ढोल पथक, दुचाकी पथक, वारकरी दिंडी, विविध चलचित्र देखावे असणार आहेत. हिंदू नववषार्चे स्वागत पारंपरिक पद्धतीने केले जाणार आहे. यात्रेत हिंदू बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी व्हावे.
हिंदुंनी आपले नववर्ष जल्लोषात साजरे करावे आणि हिंदूंमध्ये धार्माभिमान वाढावा या उद्देशाने ही यात्रा काढली जात असून यात्रेत तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे, अशी अपेक्षा नंदकुमार आरोलकर, प्रतिभा करंबेळकर यांनी व्यक्त करत ही स्वागत यात्रा काढण्यामागील उद्देश सांगितला.










