
सावर्डे : “हिंदी भाषेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी हिंदी पंधरवडा हा उत्तम संधीचा दिवस असून प्रत्येक विद्यार्थ्याने हिंदी साहित्याचे वाचन करून ती भाषा आत्मसात करावी” असे आवाहन सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना केले.
यानिमित्त विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हिंदी विभागातील गौरी शितोळे, प्रेरणा कदम, अमित साळवी यांनी सचित्र भित्तीपत्रक तयार केले. या भित्तीपत्रकाचे उद्घाटन उपप्राचार्य विजय चव्हाण यांच्या हस्ते झाले. सिद्धी इंगळे, समर्थ मेने, श्रावणी राठोड व अनघा कांबळे यांनी हिंदी भाषेविषयी माहिती दिली. सकाळच्या सत्रात सहाय्यक शिक्षक अमित साळवी यांनी हिंदी दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.
हिंदी पंधरवड्यात कविता पाठांतर, कहानी लेखन-वाचन, निबंध लेखन व भाषण स्पर्धा यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थिनींनी सादर केलेले समूहगीत विशेष आकर्षण ठरले. कार्यक्रमाचे निवेदन विद्यार्थिनी कोमल सावंतने केले. आभार विद्यार्थिनी सलोनी खांबेने मानले.
विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण,दिशा विचारे, समृद्धी कदम ज्ञानेश्वर भुवड,सर्व शिक्षक व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्व हिंदी विषय शिक्षकांनी नियोजनपूर्वक घेतलेल्या या उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून प्राचार्य राजेंद्र वारे यांनी हिंदी विभागातील सर्व शिक्षकांचे कौतुक केले.