
देवगड : अमेरिका व्हाईट हाऊस मार्फत हिंदळे गावचा सुपुत्र मिलिंद शिर्के यांना गौरवपत्र मिळाले असून अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या मिलिंद व्ही.शिर्के यांचा अमेरिकेच्या व्हाईट हाऊसकडून सन्मान करण्यात आला आहे. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी पत्र पाठवून मिलिंद शिर्के यांच्या देशसेवेसह केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला आहे.
मिलिंद शिर्के सध्या अमेरिकेतील कोलंबस (जॉर्जिया) येथे वास्तव्यास असून,त्यांनी अमेरिकेच्या सशस्त्र दलात मानाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या सेवेसाठी ट्रम्प यांनी कौतुक व्यक्त केले आहे.“तुमची सेवा प्रत्येक अमेरिकनच्या प्रशंसेस पात्र आहे. स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी केलेल्या त्यागाचा तुम्हाला अभिमान वाटावा.देश महान राहतो तो अशा शूर सैनिकांच्या बलिदानामुळे आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांमुळेच,”असे गौरवोद्गार ट्रम्प यांनी पत्रातून काढले आहेत.तसेच ट्रम्प यांनी आपल्या पत्रात “आपण सर्व मिळून अमेरिकेचे वैभव आणि महानता पुन्हा प्रस्थापित करू व ‘गोल्डन एज ऑफ अमेरिका’कडे देशाला नेऊ.देव आपल्याला आणि आपल्या परिवाराला आशीर्वाद देवो,” अशा शुभेच्छाही दिल्या आहेत.
देवगड तालुक्यातील हिंदळे गावच्या सुपुत्राला व्हाईट हाऊस कडून मिळालेला हा सन्मानामुळे गावकऱ्यांसह तालुक्यात सर्वत्र अभिमान व आनंद व्यक्त केला जात आहे.केवळ गावाचाच नव्हे तर संपूर्ण देवगड तसेच देशाला अभिमान वाटावा असा आहे.