
- राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांची माहिती
कणकवली : कणकवली-हळवल फाटा येथे वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी लवकरच हायमास्ट दिवा उभारण्यात येणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी रात्री या ठिकाणी झालेल्या अपघातानंतर हळवल फाट्यावरील अंधार आणि तीव्र वळणामुळे वाहनचालकांना रस्त्याचा योग्य अंदाज येत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली होती. या समस्येकडे लक्ष वेधत भविष्यात अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे वृत्त कोकणसाद लाइव्हने प्रसारित केले होते.
या वृत्ताची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे हळवल फाटा येथे तातडीने हायमास्ट दिवा उभारण्याची मागणी केली. यावर पालकमंत्री राणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
यामुळे लवकरच हळवल फाटा येथे मोठा हायमास्ट दिवा उभारण्यात येणार असून रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्ता स्पष्टपणे दिसण्यास मदत होईल. परिणामी या ठिकाणी होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










