
संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी अवजड वाहनांना बंदी घातलेली असतानाही, या आदेशाला धाब्यावर बसवून अनेक अवजड वाहने महामार्गावरून धावत आहेत. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून गंभीर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. परतीच्या प्रवासात अवजड वाहनांची वाहतुक सुरू आहे मग वाहतूक पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने बंदी कशाला असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात परतीच्या प्रवासाला असल्याने महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये अवजड वाहनांची अनधिकृत हालचाल अधिकच अडथळा निर्माण करत असून, अनेक प्रवासी वेळेत पोहोचू शकत नाहीत.
दरम्यान, संगमेश्वर पोलिसांनी याबाबत चिंता व्यक्त करत अवजड वाहनांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. गेल्या वर्षी देखील अशाच प्रकारे वाहतूक कोंडी झाल्याने काही अवजड वाहने बाजूला थांबवून मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलावीत, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.