
देवगड : देवगड येथील पडेल कॅन्टीननजीकच्या रत्नागिरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तिठ्यावर दुचाकी व कारमध्ये जोरदार झालेल्या अपघातात दुचाकीस्वार धनंजय उर्फ भाई कृष्णा अनभवणे (५२, रा. पडेल गावकरवाडी) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर देवगड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने कारमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. हा अपघात बुधवारी सकाळी ११ वा. च्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने, धनंजय अनभवणे हे सौंदाळे सोसायटीचे सचिव असून ते बुधवारी सकाळी सौंदाळे येथून पडेल कॅन्टीनच्या दिशेने दुचाकीने येत होते. याचदरम्यान पडेल कॅन्टीन येथून एक कार मुटाटच्या दिशेने जात होती. ही दोन्ही वाहने पडेल कॅन्टीननजीकच्या रत्नागिरीकडे जाणाऱ्या तिठ्यावर आली असता दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक बसली. या धडकेनंतर कार रस्त्याच्या बाहेर विरुद्ध दिशेने जात रस्त्यानजीकच्या वीजेच्या खांबाला धडकली. तर दुचाकीस्वार धनंजय अनभवणे हे गंभीर अवस्थेत रस्त्यावर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना प्रथम पडेल प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना तेथून देवगड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु या अपघाताची नोंद उशिरापर्यंत विजयदुर्ग पोलीस स्थानकात दाखल झाली नव्हती.