
कणकवली : कणकवली बसस्थानक आवाराच्या झालेल्या दुरवस्थेबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी बसस्थानकाच्या आवाराचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. मात्र, हे काम सुरू करताना योग्य नियोजन न झाल्याने ऐन मे महिन्याच्या हंगामात प्रवाशांना कसरत करावी लागत आहे. स्थानकासह प्रवेशद्वारावरही एकाच वेळी खोदाई करण्यात आल्याने प्रवाशांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे.बसस्थानकाचे काँक्रिटीकरण करणे आवश्यकच होते. किंबहुना ते पावसाळ्यापूर्वी व्हायलाच हवे. परंतु, हे करत असताना बसस्थानकाच्या प्लॅटफॉर्मच्या समोरचे काँक्रिटीकरण करताना डेपोतून मागील बाजूने गाड्या पुढे येऊन बसस्थानकाच्या हायवेकडील दर्शनी भागातून त्या सुटण्यासाठी नियोजन करण्याची गरज होती. येथे असणाऱ्या रिक्षा काही दिवस बसस्थानकात बसचा प्रवेश होतो, त्या मार्गावर
लाईनमध्ये लावणे शक्य होते. त्यामुळे आतील भागाचे काम झाल्यानंतर बसस्थानकाच्या प्रवेशाच्या भागातील काँक्रिटीकरण करून आत जाण्याचा मार्ग मोकळा करणे शक्य होते. मात्र, तसे न करता, एकाचवेळी अर्धा अधिक प्लॅटफॉर्म भाग व दर्शनी भागही खोदण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी बसस्थानकावर जायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बसगाड्या आत जाण्याच्या मार्गावरून बसस्थानकावर जायचे म्हटले, तर तेथे रिक्षा थांबलेल्या असतात.
त्यामुळे प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे.यासाठी आता तातडीने अन्य खोदाई न करता, प्रवेशद्वारासह खोदाई करण्यात आलेल्या भागाचे तातडीने काँक्रिटीकरण करण्याची कार्यवाही होण्याची गरज आहे. कारण ऐन हंगामातच प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत प्रवासी वर्गातून नाराजीही व्यक्त करण्यात येत आहे.