
सावंतवाडी : मळेवाड आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या आरोग्य सेविका तृप्ती कानसे यांची नुकतीच ३९ वर्षांचा प्रदीर्घ सेवा कालावधी पूर्ण होऊन त्या सेवानिवृत्ती झाल्या. मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या आजगाव, धाकोरे आणि भोमवाडी या गावांमध्ये त्यांनी गेली 9 वर्षे अत्यंत तळमळीने सेवा दिली. त्यांच्या या गौरवशाली कारकिर्दीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ग्रामपंचायत धाकोरे यांच्या वतीने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांना ग्रामपंचायतर्फे शाल, श्रीफळ, सुपारी रोप देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक यांनी त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा आदर म्हणून वैयक्तिक भेटवस्तू देऊन सन्मान केला .
या कार्यक्रम प्रसंगी सरपंच स्नेहा मुळीक, उपसरपंच रामचंद्र गवस, ग्रामपंचायत अधिकारी नितीन परब, सदस्य अल्पेशा तोरस्कर, प्रविण पालव, भारती मुळीक, रत्नाकर मुळीक, आशा सेविका, श्रुती सातार्डेकर, मदतनीस पांढरे उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी सुहास साटेलकर,योगेश गावकर,अक्षता मुळीक आदी उपस्थित होते.
तृप्ती कानसे यांचा सेवाकाळ हा केवळ आकड्यांचा प्रवास नव्हता, तर तो मानवतेच्या सेवेचा एक अध्याय होता. आपल्या सेवाकाळ मध्ये त्यांनी प्रत्येक गरजू व्यक्तीला आरोग्य सेवा पुरवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही.
आजगाव, धाकोरे, भोमवाडी येथे गेल्या नऊ वर्षांत त्यांनी या तीन गावांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेचे महत्त्व रुजवले. माता-बाल आरोग्य, लसीकरण मोहिम आणि कुटुंब नियोजन कार्यक्रमांमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले.अतिदुर्गम भागांमध्ये आणि नैसर्गिक संकटांच्या वेळी देखील त्या पहिल्यांदा मदतीला धावून जाणाऱ्या सेविका होत्या. त्यांच्या कामात आत्मीयता होती, ज्यामुळे त्या प्रत्येक कुटुंबातील सदस्य बनल्या होत्या.
सरपंच मुळीक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कानसे यांचे कार्य पैशाने मोजता येणारे नव्हते तर त्यात आपुलकी,माया,आणि सेवाभावी वृत्ती होती.तसेच उपसरपंच आणि सदस्यांनीही कानसे यांच्या निस्वार्थी सेवेबद्दल गौरवोद्गार काढले.
या सन्मानाला उत्तर देताना तृप्ती कानसे म्हणाल्या, "आपण आरोग्य सेविका म्हणून सेवा केली, पण या तीन गावांनी आपल्याला आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेम दिले. आपल्या जीवनातील हा सर्वात मोठा आणि भावनिक क्षण आहे. सर्वांचे प्रेम आणि सहकार्य आपल्यासोबत असेच कायम राहील."












