साथ रोग नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

जनतेने काळजी घ्यावी : डॉ सई धुरी
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 31, 2024 05:40 AM
views 169  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात पावसाळी हंगामात काही भागात पुरग्रस्त परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे  लेप्टोस्पायरोसीस, अतिसार, मलेरीया, डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण आढळून येतात. तसेच  पावसाळयात दुषित पाण्यामुळे जलजन्य आजार पसरतात. या रोगांच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य यंत्रणेव्दारे आवश्यक उपाययोजना सुरु आहेत. तरी या कालावधीत जिल्ह्यातील जनतेने पुढीलप्रमाणे सुचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हा  आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे.


आपले घरात अगर शेजारी तिव्र ताप, अंगदुखी थंडी वाजणे, तिव्र स्नायुवेदना, लघवी पिवळी होणे, अशा लक्षणांचा रुग्ण असल्यास अशा रुग्णास त्वरीत नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय, तसेच जिल्हा रुग्णालय येथे उपचार घेण्यास प्रवृत्त करावे. बऱ्याचवेळा रुग्णांची लक्षणे ही किरकोळ स्वरुपाची व न समजून येणारी असतात त्यामुळे किरकोळ ताप असल्यास अंगावर तोलू नये उपचारासाठी त्वरीत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल व्हावे.


रोगाबाबत घ्यावयाची खबरदारी 

ज्या व्यक्तींच्या हाता पायांवर जखम किंवा खरचटलेले असल्यास अशा व्यक्तीनी दुषित पाणी, दुषित माती, तसेच साचलेले पाणी यांचेशी संपर्क टाळावा. दुषित पाणी अगर माती यांचेशी संपर्क टाळणे शक्य नसल्यास रबरी बुट व हातमौजे वापरावे. जनावरांच्या मलमूत्राशी सरळ संपर्क टाळावा. भात शेतीच्या हंगामात काम करणाऱ्या व्यक्तींनी अंगावर जखम असल्यास जखमेला बॅन्डेज करावे. शेतात भात कापणी करणाऱ्या व्यक्तींनी शक्य असल्यास हातमौजे व रबरी  बूट वापरावे. पाळीव प्राणी, मांजर, कुत्रा यांचेशी जवळीकता टाळावी. घरातील व घराणेशजारील परिसर स्वच्छ राखावा. ब्लिचिंग पावडरने निर्जंतुक केलेले किंवा उकळून सुध्द केलेलेच पाणी पिण्यासाठी वापरावे.  गावात नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाईप लाईनमध्ये गळती असल्यास ती ग्रामपंचायतीच्या सहकार्याने तातडीने दुरुस्त करुन घ्यावी.  उंदीर, घुशी यांचा नायनाट करावा.  सर्व ताप रुग्णांनी त्यांना देण्यांत येणारा औषधोपचार नियमितच वेळेवर (डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे) सेवन करावा. नियमित ताजे व गरम अन्न खावे. शौचाहून आल्यावर व जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावे. सर्व खासगी वैदयकीय व्यवसायीक यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या ताप रुग्णांची माहिती नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांना त्वरीत कळवावी. या रोगांचे निदान रक्त व लघवी याची तपासणी करुन करता येते.


जिल्ह्यात संशयीत तापाच्या रुग्णांच्या रक्ताची व लघवीची तपासणी करुन निदान करण्याची सोय जिल्ह्यातील सर्व उप जिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गनगरी येथे उपलब्ध आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये इपिडेमीक किट (२५ रुग्णांसाठी) तर उपकेंद्रांमध्ये (५ रुग्णांसाठी) उपलब्ध ठेवण्यांच्या सूचना देण्यांत आलेल्या आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व जनतेने सतर्क राहून वेळीच निदान करुन घेवून उपचार करुन घ्यावेत व आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांना सहकार्य करावे.