आरोग्याची दैना, आरोग्यमंत्र्यांना का कळेना ?

'त्या' विधानानंतर सिंधुदुर्गात तीव्र पडसाद !
Edited by: विनायक गावस
Published on: December 09, 2023 19:20 PM
views 159  views

सिंधुदुर्ग :  कोकणचं नं. 1 महाचॅनेल कोकणसाद LIVE आणि कोकणचं पहिलं दैनिक कोकणसाद नं सिंधुदुर्गतील आरोग्यव्यवस्थेची दैना समोर आणली होती. राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील मंजूर ९१३ पैकी ३८६ पद रिक्त आहेत. तर जिल्हा परिषद आरोग्य विभागात ६२८ पैकी २२८ पद रिक्त आहेत ही वस्तुस्थिती समोर आणली होती. त्यानंतर संतापाची लाट जिल्ह्यात उसळी असतानाच विधानपरिषदेत विचारलेल्या अतारांकित प्रश्नांवर आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आरोग्य ठिकठाक आहे, आरोग्य सेवांपासून कुणी वंचित रहात नाहीत अस सांगत कोकणवासियांच्या जखमेवर मीठ चोळण्याच काम केलंय. याचे तीव्र पडसाद यानंतर जिल्ह्यात उमटताना दिसून येत आहेत. सिंधुदुर्गच्या आरोग्याची दैना, आरोग्यमंत्र्यांना का कळेना ? असा सवाल आता सिंधुदुर्गकर सरकारला विचारत आहे.


वैद्यकीय अधिक्षक, फिजीशीयन, स्त्रीरोगतज्ञ, भुलतज्ञ, टेक्निशियन अशी महत्त्वाची पद रिक्त असल्याचं वास्तव आहे. वर्ग-१ ची ३३ पैकी तब्बल २५ पद रिक्त आहेत. ८ जणांच्या जीवावर जीवनदानाचा हा कारभार चालू आहे. ‌जिल्ह्यातील सुपुत्र अन  लोकप्रतिनिधी असणारे आमदार, खासदार, पालकमंत्री, केंद्रीय मंत्री ते विधानसभा अध्यक्ष यांनीही यावर तोडगा काढणार असल्याचं सांगितलं आहे. त्यातच आता आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी तळकोकणातील आरोग्य ठिकठाक आहे. आरोग्य सेवांपासून कुणी वंचित रहात नाहीत. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये सर्व सोयींनी युक्त सुस्थितीतील प्रसूतिगृह उपलब्ध आहेत. विधान परिषदेत विचारलेल्या आरोग्याच्या अतारांकित प्रश्नावर उत्तर देताना हा अजब दावा केला आहे.  यामुळे आता आमच्या लोकप्रतिनिधींकडून आमदार, पालकमंत्री यांच्याकडून जिल्ह्याची वस्तुस्थिती आरोग्य मंत्र्यांपर्यंत पोहोचवली गेली नाही का ? अशी शंका उपस्थित झाली आहे. तर सिंधुदुर्गातून संतप्त प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत. 


आरोग्यमंत्र्यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यामध्ये उबाठाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर यांनी अंधेरी नगरी चौपट राजा अशी आरोग्य यंत्रणेची परिस्थिती झाल्याच मत मांडल आहे‌‌. वैभववाडी ग्रामीण रूग्णालय हे तर रेफर सेंटर झाल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव मीनाताई बोडके यांनी तर आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत आहे ते पालकमंत्र्यांनी मान्य केलंय असं राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सुविधां नसुन ते रेफर सेंटर झाल्याची भावना आम आदमी पक्षाचे विवेक ताम्हणकर यांनी व्यक्त केली असून आरोग्य मंत्र्यांनी स्वतः सिंधुदुर्गचा दौरा केला तर त्यांना वस्तूस्थिती कळेल असं मत मालवण उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी मांडलं आहे. आरोग्य मंत्री यांचा दावा खोटा असल्याचे विधान नाणोस ग्रामपंचायत सदस्य सागर नाणोसकर यांनी केला. सर्वच आरोग्य केंद्रात रूग्णांची हेळसांड होत असल्याच सामाजिक कार्यकर्ते रज्जब रमदुल म्हणाले. आरोग्य मंत्री यांच्याकडे चुकीची माहिती पोहोचवली गेली असल्याचे विधान देवगड युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी तर जिल्ह्यातील सर्वच रूग्णालयांची अवस्था बिकट आहे असं राष्ट्रवादीचे विशाल जाधव म्हणालेत. रूग्णांच्या नातेवाईकांच्या देखील अशाच काहीशा प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. आरोग्यमंत्री यांनी सिंधुदुर्गचा दौरा करत इथली परिस्थिती समजून घ्यावी व त्यावर उपाययोजना करावी अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.


एकंदरीत, आयसीयुत असलेल्या सिंधुदुर्गतील आरोग्याच हे वास्तव आपल्या लोकप्रतिनिधींकडून आरोग्यमंत्र्यांकडे पोहचल नसल्याच दिसतं आहे. दुसरीकडे वैद्यकीय अधिक्षक, शल्य चिकित्सकांकडून जो पत्रव्यवहार पाठपुरावा शासनाकडे केला गेला त्यात पुढं काय झालं ? हा संशोधनाचा विषय बनला आहे. चांगल्या उपचारासाठी मुंबई, कोल्हापूर अन् विशेषतः 'गोवा पे निर्भर' ही परिस्थिती आता बदलावी यासाठी आरोग्यमंत्र्यांनी वस्तूस्थितीचा सखोल अभ्यास करुन उत्तराप्रमाणे सर्व सोयींनी युक्त अशी सेवा सिंधुदुर्गकरांना द्यावी अशी मागणी होत आहे.  ‌


आरोग्यमंत्री जरा हे बघाच !

रूग्णालय | मंजूर पद. | रिक्त पद.

ग्रा.रू.कुडाळ      ३०.       १२

ग्रा. रू. देवगड.    २९.      १७ 

ग्रा.रू. दोडामार्ग.  २९.      १४

ग्रा. रू. वैभववाडी. २७.     ११ 

ग्रा. रू.‌मालवण      २८.     १२ 

ग्रा. रू. पेंडूरकट्टा.   २९.     ११

उ.जि. सावंतावडी   १०८   ३४ 

उ.जि. कणकवली . १०८   ४३

महिला रू.कुडाळ.   ४२.   १६

उ.जि. शिरोडा         ४८.    १७

उ.जि. वेंगुर्ला.          ४२.     १८

जिल्हा रू.            ३६९     १६९ 

एकूण : ९१३  भरलेली ५२७ रिक्त ३८६


आरोग्यमंत्री यांच्या बुद्धीची किव करावीशी वाटते. त्यांना कशाच काही पडलेल नाही. त्यांच्यात खरच हिंमत असेल तर त्यांनी सगळ्या शासकीय रुग्णालयांना भेट द्यावी, तेथील रूग्णांशी बोलाव. सिंधुदुर्ग सह सगळ्या रूग्णालयात 100 रूपयांच औषध सुद्धा बाहेरून आणाव लागत आहे. आरोग्यमंत्री यांना त्याच देणघेण नाही. स्वतः च भल व चेल्यापेल्याची टक्केवारी भली या भुमिकेत ते आहेत. तर आरोग्यासाठीचा पाठपुरावा करण्यासाठी सत्ताधारी आमदार, पालकमंत्री कमी पडलेत. 

विनायक राऊत, खासदार


सिंधुदुर्गवासियांची फसवणूक आरोग्यमंत्री करत आहेत. निम्मी पद रिक्त असताना सुयोग्य रितीने काम सुरू आहे अस ते म्हणत आहेत. खोटे अहवाल सादर केले जात आहेत. हे सरकार घटनाबाह्य असल्याने त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करणच चुकीचे आहे. 

अतुल रावराणे, नेते, ठाकरे शिवसेना


आपले 'आमदार' यात कमी पडत आहेत. आरोग्याची ही परिस्थिती त्यांना कळत नाही का ? याचा पाठपुरावा त्यांनी केला नाही हेच यातून स्पष्ट होते. आरोग्याच्या या गंभीर परिस्थितीवरून सत्ताधारी आमदारांच, लोकप्रतिनिधींच जिल्ह्यात लक्ष नसल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे आरोग्यमंत्र्यांना देखील राज्यातील जिल्ह्यांचा अभ्यास नाही हे दिसून येत आहे. 

साक्षी वंजारी, महिला जिल्हाध्यक्षा, कॉंग्रेस


सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यमंत्री कधी आलेत का ? इथल्या यंत्रणेसह त्यांनी बैठक घेतली आहे का ? हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. त्यांनी स्वतः सिंधुदुर्गची आरोग्य यंत्रणा किती कुचकामी आहे याचा विचार करावा. इथले रूग्ण जिल्हाबाहेर पाठवले जातात. त्यामुळे त्यांनी इथली आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत. 

सुशांत नाईक, नगरसेवक


आपली आरोग्य यंत्रणा अत्यंत बिकट आहे. आम्ही राहतो महाराष्ट्र, कर भरतो इथे पण उपचार घेतो गोव्यात. जिवंतपणी सोडा, मेल्यानंतर मृतदेह ठेवण्यासाठी आपल्या जिल्ह्यात तसे शवागृह देखील व्यवस्थित नाहीत. मेल्यानंतरही नरक यातना संपत नाहीत. दुसऱ्या राज्यांवर अवलंबून रहावं लागतं याची लाज वाटते. 

हेमंत वागळे, सामाजिक कार्यकर्ते