LIVE UPDATES

सावर्डे विद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर

Edited by: मनोज पवार
Published on: July 08, 2025 18:15 PM
views 30  views

सावर्डे : बालपणापासून विद्यार्थ्यांच्या अंगी संस्कार व देश प्रेम अंगीकारले गेले तर विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होईल गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान झालाच पाहिजे पण त्याचबरोबर संस्कारक्षम पिढी तयार होणे हे अत्यंत आवश्यक असून त्या दृष्टिकोनातून सावर्डे विद्यालयात राबविले जाणारे उपक्रम हे परिणामकारक आहेत. आपल्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून सावर्डे विद्यालयाने गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून सिद्ध केले आहे असे सावर्डे लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रकाशजी राजेशिर्के  यांनी प्रतिपादन केले.

सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सावर्डे लायन्स क्लब व आनंद नर्सिंग होम यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी रक्तक्षय तपासणी व पालकांच्या साठी मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी लायन्स क्लबचे  अध्यक्ष  प्रकाशजी राजेशिर्के, माजी अध्यक्ष विजय राजेशिर्के, व डॉ. कृष्णकांत पाटील,खजिनदार डॉ.अरुण पाटील, लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकाटे, सावर्डे डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर माधुरी पाटील, ज्येष्ठ सदस्य सिताराम कदम व अशोक बिजितकर, सदस्या दर्शना पाटील, वर्षा खानविलकर, ज्येष्ठ डॉ.अक्षय मोहिते, विद्यालयाचे प्राचार्य  राजेंद्रकुमार वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पालक,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

 खजिनदार अरुण पाटील यांच्या विशेष योगदानाने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी भेटवस्तू प्रशस्तीपत्र व गुलाब पुष्प देऊन इयत्ता दहावी मध्ये प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी आर्या नांदिवडेकर आरोही क्षीरसागर स्वरा सळमळकर व बारावीच्या विज्ञान वाणिज्य कला व एमसीवीसी विभागात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्याकडे असलेल्या गुणवत्तेचे विशेष कौतुक डॉक्टर अरुण पाटील यांनी करून त्यांचे उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी विद्यालयातील 349 विद्यार्थ्यांची रक्तक्षय तपासणी करण्यात आली त्याचबरोबर उपस्थित पालकांची मधुमेह तपासणी केली. रक्तक्षय तपासणीची माहिती संग्रहित करून जिल्हा आरोग्य यंत्रणेस सादर केले जाणार आहे यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेस शालेय विद्यार्थ्यांच्या मधील रक्तक्षय दूर करण्यास मदत होणार आहे. तपासणीअंती येणाऱ्या रिपोर्ट वरून रक्त वाढीसाठी आवश्यक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, मानसिक आरोग्य व औषध उपचारासाठी,आर्थिक साहाय्य करण्याचे लायन्स क्लब व आनंद नर्सिंग होमच्या वतीने  केले जाणार आहे.