
मंडणगड : गणेशोत्सवाचे निमीत्ताने तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्यावतीने मंडणगड तालुक्यामध्ये ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष मोहिमेअंतर्गत ठिकठीकाणी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात ‘श्रीगणेशा आरोग्याचा' या विशेष मोहिमेअंतर्गत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिषेक गावंडे यांच्या मार्गदर्शनाने नियोजन करून तालुक्यामधील ११ गणेश मंडळात शिबिरांचे आयोजन करण्यात आले. नियोजनामध्ये ग्रामिण रुग्णालय मंडणगड व सर्व प्रा.आ.केंद्र यांनी एकत्र आत्तापर्यंत 15 आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 430 गणेशभक्त व ग्रामंस्थांची तपासणी करण्यात आली. यामध्ये तपासणीच्या माध्यमातून उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, आदी आजारांचे लवकर निदान करून वेळेत उपचार मिळण्याची सोय होणार आहे.
शिबिरांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि भाविक पुढे येत आहेत. तालुक्यातील ओम श्री गणेश नवतरूण विकस मंडळ कोन्हवली, सार्वजनिक गणेश मंडळ गणवेवाडी तिडे, अमरमित्र मंडळ पेवे येथील गणेशभक्तांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी प्रधानमंत्री आयुष्मान कार्ड योजनेची माहिती देण्यात आली व नवीन कार्ड काढण्यात आले. शिबिरामध्ये सर्व वै. अधिकारी, व आरोग्य कर्मचारी यांनी गणेशभक्त व ग्रामस्थांना आरोग्याशी निगडीत आहार, स्वछता,मानसिक आजार व व्यसनमुक्ती यांवर मार्गदर्शन देण्यात आले विशेष म्हणजे, या उपक्रमाचा उद्देश फक्त तपासणीपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या आरोग्याबाबत सातत्यपूर्ण जागरूकता निर्माण करणे हा देखील आहे.गणेशस्तोव हा समाजाला एकत्र आणणारा सन असून,त्यामुळे समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा आपली आहे. “श्री गणेशा आरोग्याचा” अभियान यंदा या परंपरेला नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे.