आता जिल्ह्यातला दहशतवाद संपला का? अतुल रावराणेंचा केसरकरांना सवाल

मंत्रीपद टिकवण्यासाठी केसरकरांनी राणे यांच्याशी घेतले जुळवुन : रावराणे
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 15, 2022 19:05 PM
views 209  views

वैभववाडी : जिल्ह्यात राणेंच्या दहशतवादावर मंत्री दीपक केसरकरांनी १५ वर्षे राजकारण केले. आता तेच केसरकर राणेंच्या सुपुत्रासोबत गळाभेट घेत आहेत. पालकमंत्री असताना आम. राणेंना जेलमध्ये पाठविणा-या मंत्री केसरकरांनी आता जिल्हयातील राणेंचा दहशतवाद संपला का, याचे उत्तर द्यावे, असा सवाल उध्दव ठाकरे शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी केला आहे.

 आज श्री. रावराणे यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मंत्री केसरकर यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी सभापती लक्ष्मण रावराणे, नगरसेवक रणजित तावडे, मनोज सावंत, सुनील रावराणे, पप्पु डांगे, धुळाजी काळे आदी उपस्थित होते.

अंधेरी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मंत्री केसरकर आणि आमदार राणे यांची भेट झाली. त्या भेटीची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात रंगली आहे. यावरून रावराणे यांनी केसरकरांवर टीकास्त्र सोडले.

श्री. रावराणे म्हणाले मंत्री केसरकर यांनी गेली पंधरा वर्ष राणेंच्या दहशतवादविरोधात सातत्याने टीका केली. दहशतवाद संपला पाहीजे यासाठी ते प्रयत्न करीत होते. परंतु आतापर्यत ज्यांच्या दहशतवादाविरोधात लढले त्यांच्याच सोबत जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मुंबईत तर त्यांनी आमदार श्री. राणे आणि त्यांच्यात गळाभेट झाली. जणू काही राणेंची वागणूक योग्य असल्याचे प्रमाणपत्रच केसरकरांनी त्यांना दिले. यामुळे राणेंना आता पुन्हा आपले पुर्वीचे व्यवसाय सुरू करण्यास एकप्रकारे सहमती दिली आहे. केसरकरांनी आता जिल्ह्यातील जनतेला सांगावे, जिल्हयातील दहशतवाद संपला आहे. मंत्रीपद टिकविण्यासाठी ते आता राणेंशी जुळवुन घेत असल्याची टीका त्यांनी केसरकरांवर केली.

आमदार नितेश राणेंकडुन शिवसेनेवर होत असलेल्या टिकेबद्दल ते म्हणाले, आमदार श्री.राणे यांना शिवसेनेवर टीका करण्यासाठीच भाजपात घेतलेले आहे. अलीकडे त्यांच्या टीकेचे वाढलेले आहे. हे प्रमाण हे मंत्रीपदाच्या आशेने आहे. परंतु त्यांना मंत्रीपद मिळण्याची कोणतीही सुतराम शक्यता नाही. त्यामुळे त्यांचे मंत्रीपदाचे स्वप्न राहणार. आ.राणेंच मंत्रीपदाच नाव वेटिंग लिस्टवरच राहणार आहे. असा टोलाही त्यांनी लगवला.

ठाकरे शिवसेनेला मिळालेल्या मशाल चिन्ह हे आईस्क्रीमचा कोन असल्याच्या राणेंच्या टिकेचा देखील त्यांनी समाचार घेतला. श्री.राणे हे शिवसेनेवर खालच्या पातळीवर टीका करीत आहेत. परंतु ज्यावेळी शिवसैनिक त्यांच्यावर टीका करायला सुरूवात करतील,  त्यावेळी त्यांना खुप चटके बसतील.  हे त्यांनी घ्यानात ठेवावे. शिवसेनेवर बोलताना विचार करून बोलावे.