
गडचिरोलीत देशातील पहिली मिथेनॉल फॅक्टरी
कुडाळ : "महाराष्ट्र हे देशातील बांबू धोरण राबवणारे पहिले राज्य ठरले असून, आगामी काळात बांबू हे केवळ शोभेच्या वस्तूंपुरते मर्यादित न राहता ऊर्जा निर्मितीचे मुख्य साधन ठरणार आहे. मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांच्या पुढाकारामुळे राज्यात बांबू उद्योगात ५० हजार कोटींची गुंतवणूक होत असून, शेतकऱ्यांनी आता आंबा-काजूच्या पलिकडे जाऊन बांबू लागवडीकडे वळावे," असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी कुडाळ येथे केले.
गोव्यातील 'ब्लिस बिलानी' या संस्थेसोबत झालेल्या सामंजस्य कराराच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. यावेळी 'कोनबॅक' संस्थेचे संजू करपे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
गडचिरोलीत २० हजार कोटींचा प्रकल्प : अमेरिकन कंपनीच्या गुंतवणुकीतून गडचिरोली येथे बांबूपासून मिथेनॉल निर्मितीचा कारखाना उभारला जाणार आहे. तेथे २ लाख एकरवर बांबू लागवड होत आहे. बांबू उद्योगासाठी राज्य सरकारने आशियाई बँकेकडून ४,३०० कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत. नेदरलँड आणि फिनलँडच्या सहकार्याने आसाममधील नुमालीगड येथे ७,००० कोटी रुपये खर्चून जगातील पहिली बांबू रिफायनरी साकारत आहे.
दगडी कोळशाला बांबूचा पर्याय
वाढते तापमान आणि प्रदूषण रोखण्यासाठी औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये (Thermal Projects) आता दगडी कोळशाऐवजी बांबूचा वापर केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेत दिले असून, यामुळे मानवी जीवनावर होणारे घातक परिणाम कमी होण्यास मदत होईल. तसेच स्टील उद्योगाला लागणारी ऊर्जाही आता बांबूपासून मिळवली जाणार आहे.
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी : ६० लाखांचे अनुदान
राज्यात ११ लाख हेक्टर क्षेत्र बांबू लागवडीखाली आणण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.
> "एक हेक्टर बांबू लागवडीसाठी महाराष्ट्र सरकार ६० लाख रुपयांचे अनुदान देणार आहे. हवामान बदलामुळे आंबा, काजू आणि दुग्ध व्यवसायावर विपरीत परिणाम होत असताना बांबू हा शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्नाचा स्रोत ठरेल," असे पटेल यांनी स्पष्ट केले.
'अन्नदाता' आता 'ऊर्जादाता' होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार, शेतकरी आता केवळ अन्नधान्य पिकवणार नाही, तर तो 'ऊर्जादाता' म्हणून ओळखला जाईल. पेट्रोल-डिझेल (फॉसिल फ्युएल) विरुद्ध बायो-फ्युएल अशा लढाईत बांबू महत्त्वाची भूमिका बजावेल. वड-पिंपळाच्या तुलनेत बांबूची वाढ अतिशय जलद होत असल्याने 'ग्रीनरी' वाढवण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.










