LIVE UPDATES

हर्षल काटदरे यांना नटश्रेष्ठ बालगंधर्व संस्थेचा पुरस्कार

Edited by: मनोज पवार
Published on: June 12, 2025 15:22 PM
views 98  views

चिपळूण : चिपळूण येथील सुप्रसिद्ध  हार्मोनियम वादक हर्षल प्रसाद काटदरे यांना यावर्षीचा प्रतिष्ठेचा नटश्रेष्ठ बालगंधर्व संस्थेचा ‘खाऊवाले पाटणकर’ पुरस्कार जाहीर झाला आहे. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा हा पुरस्कार बालगंधर्व यांच्या पुण्यतिथी दिनी, ता. १५ जुलै २०२५ रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात प्रदान करण्यात येणार आहे.

बालगंधर्व यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी त्यांच्या नातेवाईक व हितचिंतकांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या संस्थेतर्फे दरवर्षी संगीत क्षेत्रातील नामांकितांंना गौरवण्यात येते. गतवर्षी हा पुरस्कार चिपळूणचे स्वराधिराज राजाभाऊ शेंबेकर तसेच प्रसिद्ध गायक महेश काळे यांना प्रदान करण्यात आला होता.

 हर्षल काटदरे यांनी संवादिनी वादनाचे प्राथमिक शिक्षण त्यांचे वडील  प्रसाद काटदरे व राजाभाऊ शेंबेकर यांच्याकडून घेतले. त्यानंतर पं. विश्वनाथ कान्हेरे व पं. प्रमोद मराठे यांच्याकडे वादनाचे सखोल मार्गदर्शन घेतले. त्यांनी पुणे विद्यापीठातून संगीत विषयात बी.ए. तर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून एम.ए. पदवी प्राप्त केली आहे.

काटदरे यांना २०२० साली चतुरंग प्रतिष्ठानच्या म्हैसकर फाऊंडेशन तर्फे चतुरंग शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती. त्यांनी अनेक संगीत नाटकांमध्ये ऑर्गन साथीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली असून, त्याबद्दल विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.

या पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना हर्षल काटदरे म्हणाले, “माझ्या यशाचे श्रेय माझे आईवडील, सर्व गुरुजन व श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ, मार्कंडी (चिपळूण) यांचे आहे. बालपणापासून मठातील भजनसेवेमुळेच संगीताची गोडी लागली आणि संवादिनीशी माझे नाते निर्माण झाले. स्वामी समर्थांची कृपा सदैव माझ्यावर राहो, हीच प्रार्थना.”

श्री. काटदरे यांच्या या सन्मानामुळे चिपळूण शहरात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.