
वैभववाडी : खांबाळे येथील श्री देवी आदिष्टीचा हरिनाम सप्ताह व जत्रोत्सव यंदा १ डिसेंबर रोजी होत असून, या पारंपरिक उत्सवाची ग्रामस्थांकडून जोरदार तयारी सुरू आहे. जत्रोत्सवाच्या निमित्ताने भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.राज्यातील नामवंत भजनी बुवांची भजने सादर होणार आहेत.
खांबाळे गावच्या श्री आदिष्टी देवीचा हरिनाम सप्ताह व जत्रोत्सव १डिसेंबरला होणार आहे. यानिमित्ताने मंदीरात भजन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.या महोत्सवात मुंबई, गोवा आणि सिंधुदुर्गातील नामवंत बुवांचा सहभाग असल्याने भजन रसिकांसाठी हा कार्यक्रम खास ठरणार आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध बुवा श्रीधर मुणगेकर, महिला बुवा आरती पाळेकर, दोडामार्ग-गोवा परिसरातील लोकप्रिय बुवा गीतेश कांबळी, बुवा विराज तांबे, बुवा हेमंत तेली आणि बुवा रोशन तांबे यांची भजने ऐकण्याची संधी भाविकांना मिळणार आहे.
हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ १ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता घटस्थापनेने होणार आहे. त्यानंतर सर्व भाविकांसाठी देवीचे दर्शन व ओठीची व्यवस्था ठेवण्यात आली आहे.या उत्सवा दिवशी सकाळी ९.३० : घटस्थापना,सकाळी १० ते सायं. ४.१५ : स्थानिक भजने,सायं. ४.३० : भजन महोत्सवाचे उद्घाटन,रात्री १२ : पालखी सोहळा
यानंतर उर्वरित भजन कार्यक्रम व स्थानिक भजने सादर होतील.२ डिसेंबर रोजी अभिषेक तसेच दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देवी आदिष्टी देवस्थान व्यवस्थापन उपसमितीच्या वतीने करण्यात आले आहे.










