देवबाग धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सुरु न केल्यास आंदोलनाचा इशारा : हरी खोबरेकर

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 24, 2023 17:48 PM
views 144  views

मालवण : तालुक्यातील देवबाग येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे अपूर्ण काम अद्याप सुरु करण्यात आलेले नाही. हे काम येत्या १५ दिवसात सुरु न केल्यास ग्रामस्थांना घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख तथा माजी जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांनी पतन अधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, या बंधाऱ्याच्या कामासाठी आमदार वैभव नाईक यांनी विशेष प्रयत्न करून हा बंधारा मंजूर केला आहे. बंधाऱ्याचे काम पावसाळ्यापूर्वी चालू करण्यात आले होते. परंतु आता अद्याप पावसाळा संपुनही काम चालू सुरु झाले नाही. त्यामुळे वादळी वारे सुरु होऊन नुकसान झाल्यास आपण जबाबदार राहणार का? यासाठी आपण सदर बंधारा काम लवकरात लवकर सुरु करण्यास ठेकेदारास सूचना देण्यात याव्यात. हे काम येत्या पंधरा दिवसात सुरु न केल्यास ग्रामस्थांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्यात येईल, असे श्री. खोबरेकर यांनी म्हटले आहे.