
वैभववाडी : माहेरून पैसे आणण्यासाठी कोळपे येथील विवाहितेला पती, सासू,सास-याने शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला. तसेच बेकायदेशीर पणे घटस्फोट दिल्याप्रकरणी सबरिना बिलाल बक्कर हिने पोलीसांत तक्रार दिली असून याप्रकरणी बिलाल नजीर बक्कर (पती), जमीला नजीर बक्कर(सासू), नजीर युसुफ बक्कर (सासरा) या तिघांविरुद्ध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
कोळपे येथील बिलाल बक्कर याचा सबरीना हिच्याशी विवाह झाला.विवाहानंतर पती, सासू सासरे यांनी तिला वारंवार माहेरून पैसे घेऊन येण्यासाठी तकादा लावला.मुंबंई ठाणे येथे प्लॅटचे पैसे भरण्यासाठी तिच्या मागणी करण्यात येत होती.तिला वारंवार सांगूनही ती पैसे घेऊन येत नसल्याने सासरच्या मंडळींकडून तिला सतत शिविगाळ करून मानसिक छळ केला जात होता.हा प्रकार सप्टेंबर २०२२ ते२० सप्टेंबर या कालावधीत सुरू होता.ती हा सर्व प्रकार सहन करीत होती.ही छळवणूक सुरू असतानाच पती बिलाल याने १८ऑगस्ट २०२४ तिच्या मोबाईल व्हाटस् अप द्वारे तिला तलाक असा संदेश पाठवून बेकायदेशीर पणे घटस्फोट दिला.हा प्रकार घडूनही सबरीना ही सासरीच होती.अखेर २०सप्टेंबर २०२४ला पती, सासू व सासरे या तिघांनी मिळून तिला घराबाहेर काढले.त्यानंतर आज तिने भुईबावडा पोलीस चौकीत फिर्याद दाखल केली.त्यानुसार बीएनएस ८६,३(५) व मुस्लिम महिला (विवाहाच्या अधिकाराचे संरक्षण)कायदा २०१९चे कलम ४प्रमाणे वरील तीघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल झाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल यांनी पिडितीच्या सासरच्या घरी भेट दिली.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस नाईक रणजित सावंत करीत आहेत.