हर हर महादेव गर्जता श्री क्षेत्र कुणकेश्वर ! भक्तांच्या अलोट जनसागरात यात्रेला प्रारंभ !

केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांनी सपत्नीक घेतले दर्शन
Edited by: प्रतिनिधी
Published on: February 18, 2023 19:24 PM
views 260  views

देवगड : कोकणची दक्षिण काशी असलेल्या श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा मोठ्या दिमाखात कुणकेश्वर शिवतीर्थावर सुरु झाली. हर हर महादेवाच्या जयघोषात, ओम नम: शिवायच्या नामजपात व श्री देव कुणकेश्वरचा नामघोषात कुणकेश्वर महाशिवरात्रौत्सवामध्ये कुणकेश्वर तीर्थस्थानी पहिल्याच दिवशी भाविकांचा जनसागर लोटला होता.  जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, प्रांताधिकारी वर्षा सिंगम, यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडली. 


दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आणि आमदार नितेश राणे यांनी सपत्नीक कुणकेश्वराचे दर्शन घेत पूजा केली. तर आ. रवींद्र फाटक, अतुल रावराणे, संदेश पारकर यांनीही कुणकेश्वरचे दर्शन घेतले. 


श्रीेदेव कुणकेश्वराचा पुजेनंतर मंदीर दर्शनासाठी खुले करण्यात आले. यानंतर दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या पहिल्या दिवशी भाविकांचा जनसागर लोटला होता. मंदिर फुलांच्या आरासाने सजविण्यात आले होते. मंदिर फुलुन सुशोभीकरण करण्यात आल्याने परिसराची शोभा वाढली आहे. भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टने चोख नियोजन केले होते. यात्रा परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आरोग्य पथक सुद्धा तैनात करण्यात आले होते. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थानचे ट्रस्टचे पदाधिकारी आणि स्वयंसेवक मेहनत घेत होते. दिवस रात्र सुश्राव्य भजने सुरु होती.   


यात्रेमध्ये  विविध प्रकारची खाद्य पदार्थाचे दुकाने, हॉटेल्स, मालवणी खाजा, कापड दुकाने, चायना खेळणी यांनी यात्रा परिसर फुलुन गेला होता.  या वेळी यात्रेच्या ठिकाणी पारंपारिक शेतीअवजारे मोठ्या प्रमाणात विक्रीस आली होती. कुणकेश्वरच्या समुद्रकिनारीही भेळ, आईस्क्रिम, इतर हॉटेल्स यामुळे समुद्रकिनारा दुकाने आणि गर्दीने फुलून गेला होता. चायना वस्तू ते हस्तकला, धामिर्क व सामाजिक संस्थांची माहिती देणारी केंद्रे यातून यात्रा सजली होतीे. भाविकांसाठी एसटी महामंडळाने जादा एसटी सोडल्या होत्या. यात्रा कालावधीत विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विज वितरणचे अधिकारी, कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत होते.


यावेळी पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला प्रगतीकडे घेऊन चालले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समृद्ध महाराष्ट्र घडवायला निघालेत या सर्वांना यश दे. आणि जे राजकारण करतात चांगली बुद्धी दे. उद्धव ठाकरे जे बोलतायत ती भाषा योग्य नाही. शिंदे गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय निवडणुक आयोगाने घेतला आहे. उद्धव ठाकरे हा संपला आहे. त्याने शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड असल्यासारखी शिवसेना चालवली. मातोश्रीची प्रॉपर्टी असल्यासारखी शिवसेना चालवली.  मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी नाही चालवली. हिंदुत्वाशी तडजोड करून मुख्यमंत्री झाले. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आता बोलू नये. हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या नावावर फक्त पैसे कमविण्याचे काम होते. ना मराठी माणसाला ना हिंदुत्वाला न्याय दिला अशी टिकाही राणे यांनी केली.