
वेंगुर्ला : ‘हर घर तिरंगा‘ अभियान एक राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जात आहे. २०२१ साली सुरू झालेल्या या अभियानाची व्याप्ती दरवर्षी वाढतच आहे. गृहिणी ते विद्यार्थ्यांपर्यंत या अभियानाचे कुतूहल आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार असून यावर्षी खास आकर्षण म्हणजे आपल्या घरावर लावण्यात येणारा तिरंगा हा लहान मुलाच्या हस्ते लावण्यात येणार असल्याची माहिती ‘हर घर तिरंगा‘ अभियानाचे जिल्हा संयोजक संदिप गावडे यांनी वेंगुर्ला येथे पत्रकार परिषदेमध्ये दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या अभियानाच्या नियोजनाचा प्रारंभ वेंगुर्ला येथून करण्यात आला.
‘हर घर तिरंगा‘ अभियानाच्या नियोजन बैठकांची सुरुवात वेंगुर्ला तालुक्यातून करण्यात आली. भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या सूचना तसेच या अभियानामार्फत घेण्यात येणारे कार्यक्रम याबद्दल नियोजन करण्यात आले असून त्याची माहिती देण्यासाठी येथील भाजपाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ‘हर घर तिरंगा‘ अभियानाचे जिल्हा संयोजक संदिप गावडे, वेंगुर्ला मंडल अध्यक्ष विष्णू परब, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी मंडल अध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, तालुका सरचिटणीस वसंत तांडेल, शक्तिकेंद्र प्रमुख गणेश गावडे, तालुका कार्यकारिणी सदस्य आनंद गावडे, युवा मोर्चाचे हेमंत गावडे आदी उपस्थित होते.
अभियानातील विविध उपक्रमांची माहिती देताना श्री. गावडे म्हणाले की, दि. १० ते १४ ऑगस्ट या कालावधीत युवा मोर्चा आणि महिला मोर्चा यांच्या पुढाकाराने बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. या तिरंगा यात्रांमध्ये भारतीय लष्कराचा गौरव करणारे फलक असणार आहेत. दि.१३ ते १५ ऑगस्ट कालावधीत बूथवरील प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यात येणार आहे. घरोघरी तिरंगा फडकाविताना लहान मुलांना प्रोत्साहन द्यावे. दि. १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात असणा-या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाजवळील परिसर तसेच स्वातंत्र्य लढ्यासंबंधित ठिकाणांच्या परिसरात स्वच्छता करून पुष्पांजली अर्पण करतना त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येणार आहे. प्रत्येक मंडलात स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतलेल्या स्वतंत्र सैनिक, युध्दात शाहिद झालेले जवान, तसेच शाहिद पोलीस कुटुंबियांची भेटघेवून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
दि. १४ ऑगस्ट रोजी विभाजन विभिषिका दिवस साजरा केला जाणार आहे. या दिवशी कोणत्याही घोषणा न देता फक्त योग्य ते फलक हाती घेऊन रॅली काढण्यात येणार आहे. यावेळी फाळणीचे दुष्परिणाम भोगावे लागलेल्या कुटुंबियांच्या भेटी तसेच फाळणीचे दुष्परिणाम दर्शविणा-या छायाचित्रांचे प्रदर्शन, व्याख्यान आदी कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे श्री.गावडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या पत्रकार परिषदेच्या प्रारंभी संदिप गावडे यांची ‘हर घर तिरंगा‘ अभियानाच्या जिल्हा संयोजकपदी निवड झाल्याबद्दल वेंगुर्ला मंडल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
‘हर घर तिरंगा‘ या अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन अभियानाचे जिल्हा संयोजक संदिप गावडे यांनी केले.