बांद्यातील प्रसिध्द श्री दक्षिणाभिमुखी हनुमान मंदिरात जयंतीचा उत्साह !

Edited by:
Published on: April 24, 2024 10:15 AM
views 35  views

बांदा : बांदा उभाबाजार येथील प्रसिध्द श्री दक्षिणाभिमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. हनुमान सेवक मंडळाचे कार्यकर्ते व भाविकांच्या उपस्थितीत बांदा शहरातून हनुमान फेरी काढण्यात आली.

   या सोहळ्यानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंदिर परिसरात मंडप, पताका, रांगोळ्या, तोरणे तसेच आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.

   उत्सवाच्या पुर्वसंध्येला सोमवारी रात्रौ  स्थानिकांच्या पारंपरिक वार्षिक भजनसेवेने उत्सवाचा आरंभ झाला. त्यानंतर आजगावकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ यांचा 'रुई महात्म्य' हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर झाला. मंगळवारी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी श्री हनुमान जन्म सोहळा होऊन पारंपारिक श्री हनुमान फेरीला आरंभ झाला. ह. भ. प. श्रीपाद पणशीकर बुवा यांचे कीर्तन झाले. तनय संजय केसरकर याला यावर्षी हनुमान होण्याचा बहुमान मिळाला. हनुमंताची रंगभुषा अण्णा धारगळकर यांनी तर मुकुट व अन्य सजावट दयानंद गोवेकर यांनी केली. भाविकांना सोट्याचा प्रसाद देत वाजत गाजत ही फेरी झाली. सायंकाळी श्री रामनाम जप तसेच श्री विठ्ठल सोहिरा महिला भजन सेवा मंडळ बांदा यांची भजनसेवा झाली. तसेच या उत्सवानिमित्त प्रसिध्द कीर्तनकार ह. भ. प. श्री. हरिहर नातु बुवा यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

    भाविकांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थिती दर्शवीली. श्री हनुमान सेवक मंडळ बांदा आणि सिद्धेश शिरोडकर यांच्यावतीने उत्सवाचे उत्तम नियोजन करण्यात आले होते.