सावंतवाडीत प्राथमिक शिक्षकांसाठी हस्ताक्षर सुधार कार्यशाळा

Edited by: जुईली पांगम
Published on: January 04, 2024 15:41 PM
views 117  views

सावंतवाडी : विद्यार्थ्यांच्या बिघडत चाललेल्या - खराब अक्षरावर तोडगा काढण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावतीने सावंतवाडी इथं प्रथमच तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी हस्ताक्षर सुधार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेय. दीपकभाई केसरकर मित्रमंडळ आणि सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी पंचायत समिती सावंतवाडीचा शिक्षणविभाग आणि गवाणकर महाविद्यालय, सावंतवाडी यांचे सहकार्य लाभलंय. 

शनिवारी 13 जानेवारीला सकाळी 9 ते 12 या वेळेत देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालय, रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी इथं ही कार्यशाळा होणार असून या कार्यशाळेत राज्यस्तरीय शासकीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविलेले विकास गोवेकर हे शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत. 

शिक्षकांनी हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर लगेच आपापल्या शाळांत हस्ताक्षर उपक्रम राबवायचा आहे. यशस्वी विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षराचे नमुने आणि त्या संबंधीचे अहवाल भरत गावडे यांच्याकडे सादर करावयाचे आहे. त्यानंतर यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षकांना दीपकभाई  केसरकर मित्रमंडळाकडून बक्षिसे दिली जाणार आहेत. 

आगाऊ नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी भरत गावडे (मोबा. 9403087796) यांच्याकडे त्वरित संपर्क साधावा आणि या उपक्रमास अधिकधिक शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.