गुरुने दिला ज्ञानरूपी वसा...

श्री माऊली संगीत विद्यालयाचा ‘गुरुवंदना’ कार्यक्रम रंगतदार
Edited by:
Published on: November 11, 2025 17:03 PM
views 148  views

वेंगुर्ला : श्री माऊली संगीत विद्यालय, तसेच गुरूकुल शिक्षण संस्था न्हावेली, शिष्य परीवारातर्फे एका अलौकिक सोहळ्याची नांदी झाली, ती म्हणजे गुरु-वंदना कार्यक्रमाची. सरस्वतीच्या मंदिरात, शिष्यांनी आपल्या गुरूंना अर्पण केलेल्या कृतज्ञतेचा तो क्षण केवळ शब्दातीत होता. हा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर भारतीय गुरु-शिष्य परंपरेच्या चिरंतन नात्याचे संगीतबद्ध झालेले स्पंदन होते.




सुप्रसिद्ध तबलावादक पं. मयंक बेडेकर यांचे शिष्य तबला विशारद भावेश राणे यांनी आतापर्यंत अनेक विद्यार्थी घडविले आहेत. या शिष्‍यवर्गाकडून गुरुवंदना कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्‍ह्यातील नामवंत कलाकार, पालक उपस्‍थित होते. यावेळी अनेक शिष्‍यांनी आपल्‍या सुमधूर वादनातून उपस्‍थितांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी पुणे येथील गुरु पंडिता क्षमा भाटे यांच्‍या शिष्‍या नृत्‍यांगना सानिका गोडसे यांनी कथ्‍थक नृत्‍याविष्‍कार सादर केला. विद्यार्थ्यांनी भावेश राणे यांना गुरुपूजन करून गुरुवंदना दिली. भावेश राणे यांनी कार्यक्रमातील सर्व सेवा आपल्‍या गुरुच्‍या चरणी अर्पण केली.


गुरुंचे स्थान भारतीय संस्कृतीत परमेश्वरापेक्षाही उच्च मानले जाते. 'गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णुः' या मंत्राचा खरा अर्थ त्या दिवशी शिष्यांनी आपल्या कलाविष्कारातून सिद्ध केला. प्रत्येक शिष्याच्या डोळ्यांत तेजाची एक निराळी ज्योत दिसत होती, जी गुरूंनी दिलेल्या ज्ञानदीपाने प्रज्वलित झाली होती. या कार्यक्रमातून केवळ कला सादर झाली नाही, तर मायेचा आणि निष्ठेचा एक अभंग धागा उलगडला. एका बाजूला गुरूंचे करुणामय मार्गदर्शन आणि दुसऱ्या बाजूला शिष्यांची उत्कट साधना, यांचे हे दृश्यात्मक आणि श्रवणीय रूप होते. गुरुंनी शिष्याला केवळ संगीत दिले नाही, तर जीवनातील चढ-उतारांवर मात करण्याची कला शिकविल्‍यास प्रत्‍यानुभव यावेळी आला.