
चिपळूण : जनता सहकारी बँक चिपळूण शाखेत दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमा उत्साहात व श्रद्धेने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून स्वामी विवेकानंद विचारांचे गाढे अभ्यासक, चारशेपेक्षा अधिक व्याख्याने देणारे, सिद्धहस्त लेखक आणि केशव आप्पाजी ओक यांच्या वारशाचे प्रतिनिधी असलेले मंदार ओक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मंदार ओक यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने झाली. त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या जीवनदृष्टी, त्यांची गुरुपरंपरेवरील श्रद्धा व समाजप्रबोधनाची शिकवण उपस्थितांसमोर उलगडून सांगितली. त्यानंतर बँकेचे व्यवस्थापक ओंकार गोंधळेकर आणि मंदार ओक यांच्या हस्ते डॉ. केशव बळीराम हेगडेवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून गुरुंच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुष्पांजली अर्पण केली.
कार्यक्रमाची सांगता मंगल पसायदानाने करण्यात आली. या कार्यक्रमासाठी मोने यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच गेल्या अनेक वर्षांप्रमाणे या वर्षीही बँकेचे ज्येष्ठ व निष्ठावान ग्राहक बाळ परांजपे यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात बँकेच्या अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून गुरुपौर्णिमेच्या पावन क्षणी गुरूंच्या स्मरणाने आपली कृतज्ञता व्यक्त केली.