
वैभववाडी : येथील श्री रामेश्वर विद्यामंदिर एडगांव नंबर १ शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.विद्यार्थांनी शिक्षक व पालक यांचे पूजन करून आपल्या गुरूंप्रती आदरभाव व्यक्त केला.
गुरुपौर्णिमा उत्सव आज सर्वत्र साजरा केला जात आहे. एडगाव येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत आपल्या पालकांचही पुजन करून हा दिवस साजरा केला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रताप रावराणे, महेश पाटील, हेमंत पाटील, अंगणवाडी सेविका नेहा पवार, रुची पवार, आरुषी बोडेकर, प्रभाकर सावंत, योगेश पवार, प्रसिद्धी पवार, सानिका सावंत, नेत्रा गुरव, वनिता पवार, कविता जगताप व सांगुळवाडी कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्या उपस्थित होत्या.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रावराणे म्हणाले, गुरुशिष्य परंपरेचा फार मोठा प्रभाव आपल्या भारतीय संस्कृतीवर आहे. आजच्या परिस्थितीत शिक्षकांच्या भूमिकेत मार्गदर्शक, सुलभक इत्यादी बदल होत असले तरी गुरूचे स्थान प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अढळ आहे. शाळा स्तरावर शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांच्या आई, वडील, पालक यांचा सन्मान केल्यामुळे विद्यार्थ्यांत आपल्या गुरुंविषयी व आपल्या आईवडीलांविषयी आदरभाव व निष्ठा अधिक वृद्धिंगत होईल. तसेच आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख होऊन त्यांचावर योग्य संस्कार लहान वयात करणे शक्य होईल. प्रशालेने साजरी केलेल्या गुरू पौर्णिमा कार्यक्रमांच कौतुक केले.
या दिनाचे औचित्य साधून साधून शाळेत सांगुळवाडी येथील कृषीकन्या यांनी रानभाज्या प्रदर्शन देखील आयोजित केले होते. यामध्ये शालेय मुलांना आपल्या परिसरातील रानभाज्याची ओळख व महत्त्व पालकांच्या उपस्थितीत पटवून देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दिप्ती पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन चेतन बोडेकर यांनी केले.