
दोडामार्ग : येथील हळबे महाविद्यालयात आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि तालुका कृषी विभाग दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी ‘महाविस्तार-AI’ या अत्याधुनिक कृषी-तंत्रज्ञान ॲपविषयी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी श्री. प्रकाश घाडगे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
त्यांनी विद्यार्थ्यांना या ॲपच्या उपयोगाबद्दल सविस्तर माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्र शासनाने विकसित केलेले हे ‘महाविस्तार-AI’ ॲप शेतकऱ्यांसाठी डिजिटल सहाय्यक म्हणून कार्य करते. यात AI-चॅटबॉटद्वारे त्वरित कृषी सल्ला, हवामान अंदाज, चालू बाजारभाव, कीड-रोग नियंत्रण उपाय, खतांचे प्रमाण सुचवणारे गणक आणि विविध सरकारी योजनांची माहिती उपलब्ध आहे. या ॲपद्वारे शेतकऱ्यांना उत्पादन वाढ, खर्चात बचत आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा सहज लाभ मिळू शकतो. पिके आणि सरकारच्या विविध योजनांसंदर्भात वेळेत आणि परिपूर्ण माहिती न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते, परंतु ‘महाविस्तार-AI’ ॲपमुळे शेतकऱ्यांची ही समस्या दूर होण्यास नक्कीच मदत होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या मार्गदर्शन सत्राचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी या ॲपची माहिती घरी, गावात, परिसरात आणि मित्रपरिवारात देऊन जनजागृती करावी हा होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. सोपान जाधव होते. त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ते ग्रामीण समाजापर्यंत पोहोचवावे, यावर भर दिला. कृषी व तंत्रज्ञान यांचे एकत्रित भान विद्यार्थ्यांना भविष्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरेल, असे ते म्हणाले. यावेळी तालुका कृषी विभागाचे उप कृषीअधिकारी अजितकुमार कोळी, सांख्यिकी पर्यवेक्षक कडगावकर, सहाय्यक कृषि अधिकारी गोपाळ लोखंडे व प्रियांका गोवेकर, महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविस्तार-AI ॲपचे महत्त्व समजून घेत विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात याबाबत जागरूकता करण्याचे आश्वासन दिले.










