भोसले नॉलेज सिटीत पॉश कायद्यावर मार्गदर्शन !

Edited by: विनायक गांवस
Published on: August 24, 2024 12:26 PM
views 87  views

सावंतवाडी : भोसले नॉलेज सिटीमध्ये पॉश कायदा- २०१३ या विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, प्रतिबंध व निवारण) २०१३ हा एक विशेष कायदा आहे जो आपल्या देशात महिलांसाठी सुरक्षित कार्यस्थळे निर्माण करण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आला आहे. या कायद्यातील तरतूदींची माहिती संस्थेतील कर्मचाऱ्यांना असावी या हेतूने या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. 

कार्यक्रमासाठी कोलकाता येथील थ्री-पी असोसीएट्सचे संचालक अजय अगरवाल हे तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. दहा पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कोणत्याही कामाच्या ठिकाणी या कायद्याची आवश्यकता असून अशा सर्व आस्थापनांसाठी हा कायदा बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक किंवा खाजगी सर्व कामाच्या ठिकाणी महिलांना लैंगिक छळापासून संरक्षण मिळेल याची खात्री हा कायदा करतो. लैंगिक समानता, जीवन आणि स्वातंत्र्य तसेच कामाच्या ठिकाणी समानतेचा अधिकार यामुळे महिलांना प्राप्त होतो. या कायद्याच्या माहितीमुळे महिलांमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची भावना वाढेल, त्यांचा कामातील सहभाग सुधारेल व परिणामी त्यांचे आर्थिक सक्षमीकरण व सर्वसमावेशक वाढ होईल असा विश्वास त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला. 

कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक आणि भोसले नॉलेज सिटीमधील इंजिनिअरिंग, फार्मसी व सीबीएसई स्कूलचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.