
कणकवली : येथील कणकवली महाविद्यालयातील वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरिता आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागामार्फत व मुंबई ग्राहक जागृती मंचच्या सहकार्याने 'वित्तीय साक्षरता' विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
विद्यार्थी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर वैयक्तिक जीवनात आर्थिक पातळीवर यशस्वी व्हायचे असतील तर त्याने आपल्या उत्पन्नातून काही भाग सक्तीने बचत करण्याची आवश्यकता असते. या संदर्भात मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या प्राची मयेकर यांनी पाॅवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे उपस्थित विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
मुंबई ग्राहक जागृती मंचच्या मिलन मेस्त्री यांनीही 'ग्राहकांचे हक्क' याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना ग्राहकांच्या हक्काची माहिती होण्यासाठी 'ग्राहक जागर' या विषयावर फिल्म दाखवून त्याआधारे ग्राहकांचे हक्क समजावून सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यावेळी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच बचतीची सवय लावून घेणे ही काळाची गरज आहे. बचत आणि खर्च याचा ताळमेळ भविष्य काळात आवश्यक असतो, म्हणून अशा प्रकारचे प्रशिक्षण गरजेचे असते.
कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू यांनी शुभेच्छा दिल्या.
आजीवन अध्ययन विस्तार विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी प्रास्ताविक व आभार मानले. या कार्यक्रमात वरिष्ठ महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या विद्यार्थ्यांसहित कला, वाणिज्य व बॅचलर ऑफ अकाउंट या विभागाचे २५० विद्यार्थी सहभागी झाले होते.