बांदा केंद्र शाळेत रेबीजबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Edited by:
Published on: June 28, 2025 20:07 PM
views 106  views

बांदा : गंभीर अशा संसर्गजन्य समजल्या जाणाऱ्या रेबीज रोगाबाबत पीए श्री बांदा नं.१केंद्रशाळेत शाळा व्यवस्थापन समिती व वर्ल्डवाईड वेटेरीनरी सर्हीस यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.    

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या मार्गदर्शन वर्गात रेबीज मिशनबाबत अमित नाईक व वसंत तावडे यांनी विद्यार्थ्यांना पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी, प्राण्यांना होणारे विविध आजार, रेबीज रोगाचा प्रसार कसा होतो, तसेच कुत्रा चावल्यानंतर जखम झाल्यास कोणती काळजी घ्यावी, रेबीज या रोगावरील औषधोपचार याबाबत विद्यार्थ्यांना माहिती समजावून सांगितली. तसेच एखाद्या वेळी भटका कुत्रा अंगावर धावून येत असेल तर कशी काळजी घ्यावे यांचे प्रात्यक्षिक दाखवून ते विद्यार्थ्यांच्याकडून करून घेण्यात आले.

सध्या बांदा गावात‌ भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून ही एक गंभीर बाब आहे. शाळेच्या परिसरात देखील ही कुत्री वावर‌ करत असतात. एक कुत्र्याने‌ शाळकरी मुलाचा  चावा घेतला होता त्याला शिक्षक आणि ग्रामस्थाच्या यांच्या मदतीने ताबडतोब बांदा रुग्णालयात नेले त्यानंतर पुढील उपचारासाठी सावंतवाडी शासकीय रुग्णालयात शिक्षक वर्ग स्वतः घेऊन गेले. तसेच शाळा परिसरातील या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शाळेच्यावतीने बांदा ग्रामपंचायत व पोलीस ठाणे यांना देण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन वर्गावेळी मुख्याध्यापक शांताराम असनकर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य हेमंत‌ मोर्ये, संतोष बांदेकर पालक संदीप वायंगणकर, रावबहद्दूर‌ मौर्या व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपशिक्षक जे.डी‌.पाटील यांनी केले तर आभार हेमंत मोर्ये यांनी मानले.

ग्रामपंचायतच्या सहकार्याने मिशन रेबीज मार्फत बांदा गावातील सर्व शाळांच्या परिसरातील भटक्या कुत्र्यांना अँटी रेबीज इंजेक्शन व नसबंदीकरण करून बांदा गाव सिंधुदुर्गातील 100% भटक्या कुत्र्यांची नसबंदीकरण केलेले पहिले गाव असेल यासाठी मिशन रिलीज मार्फत लागेल ती वैद्यकीय मदत करण्याचा मानस अमित नाईक यांनी व्यक्त केला.  ग्रामपंचायत प्रशासन सुद्धा सकारात्मक आहे असे ग्रामपंचायतकडून सांगण्यात आले