क्षेत्र कुठलही असो टॉप व्हा : ऍड.सुहास सावंत

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 17, 2024 14:23 PM
views 39  views

सिंधुदुर्गनगरी : आता ए आय तंत्रज्ञान विकसित झाले आहे. हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात स्वीकारले जाणार आहे. त्यामुळे खासगी नोकऱ्या कमी होणार आहेत. जीवनात अधिकारी, व्यावसायिक अथवा शेतकरी व्हा पण जे काय व्हाल त्यात टॉप व्हा, असे आवाहन सकल मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक ऍड सुहास सावंत यांनी दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. 

           मालवण तालुक्यातील सकल मराठा समाज कट्टा दशक्रोशी संघटनेच्यावतीने मराठा समाजातील दहावी परीक्षेत ८० टक्के आणि बारावी परीक्षेत ७५ टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव वराड हडपीवाडी येथील नम्रता हॉल येथे रविवारी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ऍड सावंत बोलत होते. यावेळी उद्योजक सुभाष काराणे, समाजाचे मालवण तालुका उपाध्यक्ष विनायक परब, कृषी मंडळ अधिकारी धनंजय गावडे, माजी सभापती राजेंद्र परब, मंडळ अध्यक्ष डॉ जी आर सावंत, जयद्रथ परब, विष्णू लाड, वैष्णवी लाड, गोळवण सरपंच सुभाष लाड, उपसरपंच सुमित सावंत, सुशील गावडे, भाई राणे, चाफेखोल माजी सरपंच श्रीमती गावडे, सतीश दळवी, बाबा राणे, स्वप्नील गावडे, वराड सरपंच शलाका रावले, शेखर मसुरकर, भाई परब, वैभव जाधव, मनोज राऊळ, राकेश डगरे, अमित सावंत, समीर रावले, राजा गावडे आर्या गावडे, मनस्वी गावडे आणि साक्षी गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. तसेच विष्णू लाड, वैष्णवी लाड या दांपत्यासह सुभाष लाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 

       यावेळी पुढे बोलताना ऍड सावंत यांनी, समाजाच्या सभोवताली जे काय चालते ते डोळसपणे बघा. अभ्यास केल्यास परीक्षेत गुण मिळतील. परंतु सभोवतालचा अभ्यास न केल्यास आयुष्यात ठेच खावी लागेल. जीवनात अधिकारी, व्यावसायिक अथवा शेतकरी व्हा पण जे काय व्हाल त्यात टॉप व्हा. ए आय तंत्रज्ञान बहुतेक नोकऱ्या काढून घेणार आहे. त्यामुळे याचा अभ्यास करून तुमच्या करिअरची निवड करा. मराठा समाजाने योजनांचा फायदा घ्यायला शिकले पाहिजे, असे विद्यार्थ्यांना आवाहन करीत सारथी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. तसेच यू पी एस सी, एम पी एस सी, इंजिनियर किंवा अन्य शिक्षण घेताना मिळणाऱ्या लाभाची माहिती दिली. 

         यावेळी विनायक परब यांनी, आयुष्यभर सतत विद्यार्थी रहा. समाज, निसर्ग आणि सर्व गोष्टींकडे विद्यार्थी म्हणून पाहा. तरच तुम्ही यशस्वी व्हाल. पॉवर असणारे अधिकारी व्हा. जिंकणारच, असा आत्मविश्वास ठेवा, गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन केले. तर राजेंद्र परब यांनी, खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनाला आता महत्व प्राप्त झाले आहे. आताच तुम्हाला निश्चित करायचे आहे. येथे योग्य दिशेची गरज आहे. मनातील भीती काढून टाकावी. बिनधास्त सामोरे जाण्याची तयारी ठेवा. अपयश आले म्हणून घाबरून जायचे नाही. आपली क्षमता ओळखून धेय्य सुरू ठेवायचे आहे. आपण कुठेही कमी नाही, असे ठरवून अभ्यास केला पाहिजे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन जयंद्रथ परब, वैष्णवी लाड यांनी केले. यावेळी मराठा समाजातील खासदार झाल्याने नारायण राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. कृषी मंडळ अधिकारी धनंजय गावडे यांनी दहावी, बारावी नंतर योग्य करिअर कसे निवडावे ? याबाबत मार्गदर्शन केले.