LIVE UPDATES

कुडाळात अन्नसुरक्षा नवीन कायद्यांविषयक मार्गदर्शन शिबिर

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 27, 2026 15:38 PM
views 18  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक, खानावळ, बेकरी, किराणा व्यापारी आणि सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बदललेले अन्नसुरक्षा नियम आणि अन्नपदार्थांचे पॅकेजिंग याबाबत संपूर्ण माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने विशेष माहिती व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवार, दिनांक २९ जून २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे संपन्न होणार आहे.

अन्न व औषध प्रशासन (FDA) नियमावलीतील नवीन बदलांमुळे बऱ्याच व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था असते. नियमांचे पालन न झाल्यास होणारी दंडात्मक कारवाई टाळता यावी, यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या विशेष विनंतीवरून या शिबिराला जिल्ह्याचे अन्नसुरक्षा प्रशासनाचे उपायुक्त  गायकवाड आणि अन्नसुरक्षा निरीक्षक  अभय चंदनशिवे साहेब स्वतः उपस्थित राहून व्यापाऱ्यांना कायदेशीर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच महासंघाचे प्रमुख पदाधिकारीही यावेळी उपस्थित राहतील.

या शिबिरामध्ये हॉटेल व्यावसायिक, खानावळ चालक, बेकरी, केक शॉप, मिठाई विक्रेते, किराणा व्यापारी, चायनीज सेंटर, कोकणी मेवा व वडापाव सेंटर चालकांसह सर्व प्रकारच्या लहान-मोठ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना प्रत्यक्ष माहिती दिली जाईल. तसेच उपस्थित व्यापाऱ्यांसाठी प्रश्न-उत्तर सत्राचेही आयोजन करण्यात आले आहे, जेणेकरून त्यांच्या मनातील शंकांचे जागेवरच निरसन होईल.

हे प्रशिक्षण सर्व व्यापाऱ्यांसाठी पूर्णपणे मोफत असून, भविष्यातील दंडात्मक कारवाई व कायदेशीर कटकटी टाळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व खाद्यपदार्थ संबंधित व्यापाऱ्यांनी या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, सर्व पदाधिकारी, हॉटेल संघटना, तालुकाध्यक्ष आणि सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठा समाज हॉल येथे सोमवार, २९ जून २०२६, सायंकाळी ठीक ४:०० वाजता होणार असून सर्व व्यापाऱ्यांसाठी मोफत.