
कणकवली : जिल्ह्यातील भजनी कलावंतांची भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग ही संस्था विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. जिल्ह्यातील भजनी कलावंतांना व्यासपीठ प्राप्त व्हावे यासाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री चषक २०२४ ही भजन स्पर्धा कुडाळ येथे पार पडली. आता राज्याचे मत्स्योद्योग तथा बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रेरणेतून आणि भजनी कलाकार संस्थेमार्फत आता प्रत्येक तालुक्यामध्ये पालकमंत्री चषक २०२५ भजन स्पर्धा राबविण्यात येणार आहे, असे संस्थेचे अध्यक्ष संतोष कानडे यांनी सांगितले.
या भजन स्पर्धेचा शुभारंभ देवगड तालुक्यातून करण्यात येत असून तालुक्यामध्ये भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग आणि श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा दक्षिण काशी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असलेल्या कुणकेश्वर मंदिर येथे राबविण्यात येणार आहे. या भजन स्पर्धेचा २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शुभारंभ होणार आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक १० हजार २३ रु. , द्वितीय पारितोषिक ५ हजार २३ रु. ,तृतीय पारितोषिक ३ हजार २३ रु. आणि उत्तेजनार्थ एक पारितोषिक २ हजार २३ रु. तसेच वादक,गायक,तबला,कोरस प्रत्येकी रोख १ हजार २३ रु. अशी बक्षिसे आहेत. प्रथम तीन आणि एक उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त संघांना आकर्षक चषक आणि सर्व सहभागी संघांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करू तसेच लागणारे सर्व सहकार्य श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट तर्फे भजन स्पर्धेसाठी आम्ही करू, असे आश्वासन विश्वस्त मंडळ अध्यक्ष एकनाथ तेली यांनी दिले. या स्पर्धेचे थेट यू-ट्यूब लाईव्ह प्रक्षेपण असून देवगड तालुक्यातील केबल टीव्हीवर स्पर्धा प्रदर्शित केली जाणार आहे. देवगड तालुक्यातील सर्व भजनी कलाकारांना भजनी कलाकार संस्थेच्यामार्फत व्यासपीठ प्राप्त व्हावं यासाठी या भजन स्पर्धेचे नियोजन करण्यात आले, असून तालुक्यातील सर्व कलावंत आणि भजन रसिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संतोष कानडे यांनी केले आहे. देवगड येथे या स्पर्धेबाबत माहिती देतेवेळी भजनी कलाकार संस्थेचे सचिव गोपीनाथ लाड, उपाध्यक्ष संदीप नाईकधुरे, संचालक संतोष मिराशी, सहखजिनदार मयूर ठाकूर, ज्येष्ठ बुवा दिपक पाळेकर,चंदन घाडी उपस्थित होते.