विकासकामे फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा : पालकमंत्री

निधी अखर्चित राहता कामा नये !
Edited by: देवयानी वरसकर
Published on: December 22, 2023 17:45 PM
views 169  views

सिंधुदुर्गनगरी : सन 2023-24 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून विकासकामांसाठी पुरेसा निधी प्राप्त झालेला आहे. प्राप्त निधीतून विकासकामे फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करुन निधी अखर्चित राहणार नाही याची सर्व यंत्रणांनी नोंद घ्यावी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ते तातडीने पूर्ण करण्यासाठी मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करण्याचे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. 

यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पेालिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हा नियोजन अधिकारी भगवान पवार तसेच संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.  बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा नियेाजन अधिकारी श्री. पवार यांनी सादरीकरणाव्दारे खर्चाची माहिती दिली. पालकमंत्री म्हणाले, आर्थिक वर्षे संपायला कमी कालावधी राहिला असल्याने विकासकामांचे सूक्ष्म नियेाजन करुन ती कामे प्राधान्याने पूर्ण करा. फेब्रुवारी महिन्यात आंगणेवाडी येथील जत्रेचे नियोजन आत्तापासून सुरू करावे.  एसटी बसेसची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने प्राधान्यक्रम ठरवून नियोजन करावे. जिल्ह्याचा विकास आराखडा बनवत असतना सर्व क्षेत्रांतील तज्ज्ञांची बैठक घ्यावी. या बैठकीत विकास साध्य करताना येणाऱ्या समस्या, त्यावरील उपाययोजना यांची चर्चा करावी. देशात आणि राज्यात सध्या जेएन वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. अशा परिस्थितीत चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, चाचण्या करण्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञांची नेमणूक करावी, जिल्ह्यात पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे निर्देश देखील पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.

राज्याचे उत्पन्न  वन ट्रिलियन डॉलर पर्यंत नेण्याचा प्रयत्न  राज्य शासनाचा असून त्यासाठी नियुक्त झालेल्या अभ्यास गटाने या जिल्ह्यातील उत्पन्न वाढीचे स्त्रोत जमा करावेत, आकडेवारी जमा करावी, हा सर्व अहवाल मराठी मधून तयार करावा  व यामध्ये लोकप्रतिनिधीनाही सहभागी करून  त्यांच्या सूचना घ्याव्यात, कृषी फलोत्पादन मत्स्य व्यवसाय आधी इंडस्ट्री मधील शेतकरी उत्पादक यांच्या समस्या जाणून घ्याव्या व  या जिल्ह्यातील उत्पन्न वाढीसाठी चांगला प्रयत्न करावा असे आवाहनही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केले. तत्पूर्वी कोल्हापूर विद्यापीठाचे अर्थशास्त्र  प्राध्यापक ज्ञानदेव तळुले यांनी या विषयातील अभ्यासपूर्ण माहिती सभागृहात दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नौसेना दिनाच्या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा यशस्वी झाला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा व जिल्हा परिषद यंत्रणा या सर्व यंत्रणांनी काम केले. त्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण  यांच्या अभिनंदनाचा  ठराव घेत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्यातील शिक्षक भरती संदर्भातील जाहिरात तात्काळ काढण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.यावेळी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांविषयी तर आमदार नितेश राणे यांनी अनियमित बस फेऱ्या नियमित करुन विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्याची विनंती पालकमंत्र्यांना केली.