कबूलायतदार गावकर जमिनीचा प्रलंबित प्रश्न सोडवणार : पालकमंत्री रविंद्र चव्हाण

Edited by: विनायक गांवस
Published on: March 13, 2024 13:15 PM
views 153  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील गेळे गावातील कबूलायतदार गावकर जमीनीचा प्रश्न हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रलंबित होता. विशेष म्हणजे कबूलायतदार गावकर पद्धत ही सिंधुदुर्ग जिल्हा वगळता इतर कुठेही अस्तित्वात नाही. त्यामुळे हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुपुत्र म्हणून येथील ग्रामस्थांच्या समस्या फार पूर्वीपासूनच अगदी जवळून बघितल्या आहेत. कबूलायतदार गावकर जमिनीचा प्रलंबित प्रश्न सोडवणार असं मत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. ‌


ते म्हणाले, आपलं सरकार हा प्रश्न नक्कीच मार्गी लावेल असा विश्वास गेळे गावातील ग्रामस्थांच्या मनात आहे. हा विषय सोडविण्याच्या दृष्टीने शासनाला सहकार्य करण्यासाठी हे ग्रामस्थ सकारात्मक आहेत. या प्रश्ना संदर्भात गेळे गावातील ग्रामस्थांसोबत आज मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या प्रश्नावर नियमानुसार कार्यवाही करुन येत्या २ महिन्यात हा विषय सोडविण्याच्या सूचना या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या बैठकीला भाजपचे सावंतवाडी, आंबोलीचे तालुकाध्यक्ष संदिप गावडे यांच्यासह गेळे गावचे ग्रामस्थ प्रत्यक्ष तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे हे ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते.