
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आज 'सिंधुदुर्गचा राजा'चे अत्यंत श्रद्धापूर्वक वातावरणात मनोभावे दर्शन घेतले. श्रींच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी संपूर्ण जिल्हावासीयांच्या सुख, समृद्धी आणि सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.
'सिंधुदुर्गचा राजा'ची स्थापना झाल्यापासून दरवर्षी राणे कुटुंबीय न चुकता बाप्पाच्या दर्शनाला येतात. या परंपरेनुसार मंत्री नितेश राणे यांनी आज बाप्पाचे दर्शन घेतले. दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले, "बाप्पाच्या अथांग आशीर्वादानेच आज आमचे कुटुंब जनतेची सेवा करत आहोत. बाप्पाच्या कृपेमुळेच आज नारायण राणे खासदार, निलेश राणे आमदार आणि मी पालकमंत्री आहोत, सिंधुदुर्गच्या जनतेची सेवा करण्याची ताकद बाप्पाने आम्हाला दिली आहे."
या दर्शन सोहळ्यादरम्यान महायुतीतील भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विनायक राणे, देवेंद्र नाईक, सचिन काळप, आबा धाडम, काका कुडाळकर, संजय पडते, प्रसन्ना गंगावणे, राजवीर पाटील, सुनील बांदेकर, निलेश परब, सिताराम तेली, रुपेश कानडे आणि बंड्या सावंत यांच्यासह दोन्ही पक्षांचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










