पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला उपोषणकर्त्यांशी संवाद

NHM काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 21, 2025 21:39 PM
views 50  views

सिंधुदुर्गनगरी : नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. रुग्णांना सेवा देताना कोणत्याही प्रकारची हयगय नको. रुग्णसेवेला प्रथम प्राधान्य द्या. आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करा. रुग्णसेवेबद्दल नागरिकांच्या कोणत्याही तक्रारी येता कामा नये असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला दिले. पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषणकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देशित केले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, पी.एम. विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे  तसेच संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. 

यावेळी कारीवडे, सावंतवाडी येथे नागरिकांना आरोग्य सेवा मिळत नसल्याबाबत उपोषणाचा इशारा दिला होता. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या लवकरच पुर्ण करण्यात येतील असे आश्वासित केले. पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारणेला प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. अत्याधुनिक रुग्णवाहिकांची खरेदी करण्यात येईल. सावंतवाडी येथे सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याबाबत अधिक गतीने पाठपुरावा करण्यात येईल. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करणार असल्याचेही ते म्हणाले.

राष्ट्रीय आरोग्य मिशन  (NHM) कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू होते. या शिष्टमंडळाने देखील पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेत सर्व कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याची विनंती केली. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत नक्कीच सकारात्मक मार्ग काढण्यात येईल. प्रशासन कायमस्वरुपी तुम्हाला मदत करणार असून रुग्णसेवा ही महत्वाची असल्याने काम बंद आंदोलन संपवून उद्यापासून सर्वांनी कामावर हजर व्हावे असेही त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले असता शिष्टमंडळाने देखील सकारात्मक प्रतिसाद दिला.